पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघरे (पारोळा) येथील जंगलात एका कारने अचानक पेट घेतला. घटनेत एका २५ वर्षीय तरुणाचा कारमध्येच जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पारोळा चोरवड या ग्रामीण रस्त्यावर पारोळ्यापासून १० किमी अंतरावर पोपटनगर गावानजीक रस्त्याच्या कडेला जळालेल्या कारमध्ये एका ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह काही लोकांना दिसून आला. त्यांनी गावचे पोलिस पाटील यांना कळविले की, पोपटनगर भागात एका कारमधून धूर निघत आहे. पोलिस पाटीलांनी लगेच पारोळा पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. पोलिस निरीक्षक संतोष भंडारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल, निलेश गायकवाड पोलिस पथकासह घटनास्थळी पोहचले वैद्यकीय पथक डॉ. सुनील पारोचे, डॉ. चेतन नाईक यांनी ही घटनास्थळी धाव घेतली.
कारसह त्या तरुणाचा मृतदेह जाळून खाक झाल्याने ओळख पटणे अशक्य होते. मग या तरुणाने शेवटचा कॉल हा पाचोरा येथे नातेवाईकांना केल्याचे समजले. त्यावरून शोध घेतला असता हा तरूण शुभम संजय पाटील (३१) हा अमळनेर खोकरपाट येथून पाचोरा येथे नातेवाईकांकडे कारने (एमएच १८/डब्लू४९५६) निघाला होता. मग कारसह त्यांचा जळून मृत्यू कसा झाला. त्यासोबत आणखी कोणी होते का? त्याचा घातपात करून कार पेटवून त्याला ही जाळून ठार मारण्यात आले का? याची उत्तरे पोलिस शोधात पुढे येतील.
नातेवाईकांचा आक्रोश
नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत मुलाचा जळलेला मृतदेह पाहून एकच आक्रोश केला. माझ्या मुलाचा खून करून त्याला मारण्यात आले आहे. या मारेकऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी नातेवाईकांनी यावेळी केली. घटनास्थळी कार व मृतदेहाचा पंचनामा करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.