नवी दिल्ली (वृत्तसंस्था) छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एका तरुणाला झाडाला उलटे लटकवून मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. पाचही आरोपींनी चौकशी दरम्यान मारहाण करण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांनी पीडित युवकावर चोरीचा आरोप लगावला आहे. चोरीचा आरोप करत आरोपींनी पीडित तरुणाला बेदम मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण महावीर सुर्यवंशी रतनपूरमधील रहिवासी आहे. महावीर सिपत परिसरातील उच्छभट्टी गावात राहून तो मजूर आणि वॉचमन म्हणून काम करतो. पोलिसांना माहिती मिळाली की, 24-25 एप्रिलच्या मध्यरात्री मनीषने महावीरला घरात घुसण्याचा प्रयत्न करताना पाहिले होते. यावेळी महावीर पळून जाण्यात यशस्वी ठरला, मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी मनीषने महावीरला चोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनीषने महावीरविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवला नाही, त्यामुळे पोलिसांनी महावीरला इशारा देऊन सोडून दिलं. त्यानंतर मनिषने महावीरवर आरोप केला की बुधवारी रात्री महावीर पुन्हा त्याच्या घरी पोहोचला आणि बाहेर पार्क केलेल्या त्याच्या मोटरसायकलचे नुकसान करून पळून गेला. यानतरं गुरुवारी मनीष आणि इतर चार आरोपींनी महावीरला पकडले आणि कथितपणे त्याला गावातील वीटभट्टीजवळील झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण केली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.