जळगाव ( प्रतिनिधी ): गेल्या सात महिन्यांपूर्वी केलेल्या बांधकामाचे पैसे मागण्यावरून मुस्तफा शेख सलीम (वय ३६, रा. पिंप्राळा हुडको) याच्यावर दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने गोळीबार केला. परंतू सोबत असलेल्याने त्यांना धक्का दिल्याने ते बालंबाल बचावले. त्यानंतर त्यांच्या भावाच्या पायावर दुसरी गोळी झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये घडली.
शहरात मतदान शांततेत सुरु असतांना गोळीबाराच्या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या मुस्तफा शेख सलीम व मुस्तकीम या दोघांनी शहरातील संत गाडगेबाबा चौकात एका जणाच्या घराच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. सुमारे सात महिन्यांपुर्वी झालेल्या बांधकामाच्या कामावरुन मुस्तफा यांनी समोरील व्यक्तीकडे पैशांची मागणी केली होती. दरम्यान, मुस्तफा हा त्याचा भाऊ मुस्तकीम आणि त्यांचा नातेवाईक असलेला शाहीद शेख सुभान (वय १८, रा. ख्वाजानगर) यांच्यासोबत दुचाकीने पिंप्राळा परिसरात मतदानासाठी जात होते.
मारहाण करीत डोक्याला लावली पिस्तुल
आनंदबन सोसायटी जवळ समोरून दुचाकीवर दोन जण आले. पैसे देण्यावरून त्यांनी दोघांना मुस्तफा याच्यासह त्याच्या भावाला मारहाण केली. त्या वेळी अन्य दोन दुचाकीवर चार जण त्याठिकाणी आले. त्यातील एका जणाने थेट मुस्तफा शेख यांच्या डोक्याला पिस्तूल लावली.
धक्का दिल्याने पिस्तुलने केली मारहाण मारहाण केल्यानंतर डोक्याला पिस्तुल लावलेल्या तरुणाला मुस्तफाच्या नातेवाईकाने धक्का दिला. त्यामुळे समोरील व्यक्तीने हवेत गोळी फायर केल्याने ती चुकली. परंतू समोरील व्यक्तीने धक्का देणाऱ्या शाहीद याच्या खांद्यावर पिस्तूलच्या उलटबाजूने मारून दुखापत केली आणि त्याच्याजवळ असलेला मोबाईल देखील जबरीने हिसकावून घेतला.
गोळीबार करणारे घटनास्थळहून पसार
दुसरी गोळी झाडली भावावर पहिली गोळी हवेत फायर झाल्यानंतर त्या व्यक्तीने दुसऱ्या दुचाकीवर असलेल्या मुस्तफा यांचे भाऊ मुस्तकीम शेख सलीम (वय ३०) यांच्या पायाच्या दिशेने देखील गोळी झाडली. परंतू त्यांनी वेळीच पाय बाजूला केल्यामुळे ती गोळी जमिनीवर फायर झाल्याने दोघ बालंबाल बचावले. त्यानंतर गोळीबार करणाऱ्यांनी देखील तेथून पसार झाले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी शाहीद शेख याने दिली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस यंत्रणेची तारांबळ
शहरातील किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडत असतांना, दुपारच्या सुमारास अचानक गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ माजून गेली होती. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती.
पोलीस अधीक्षकांनी जाणून घेतली घटनेची माहिती
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.
गोळीबार करणाऱ्यांच्या शोधार्थ पथक रवाना
गोळीबार करणाऱ्या संशयितांमधील तुषार सोनवणे, सतीश चव्हाण, आबा मनोज या चार जणांचे नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी दिली.















