मुंबई (वृत्तसंस्था) एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं, असा सल्ला देतानाच पण ठिक आहे सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.
त्यांची सत्ता गेली याची ही अस्वस्थता आहे. माणसाने आशा ठेवावी. त्यांनी मागेही मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन, असे सांगितले होते आणि काल परवा असंच काहीसं सांगितले आहे. ठिक आहे त्याच्याकडे लोक बारकाईने लक्ष देतात, अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल, असेही शरद पवार म्हणाले. भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार काम करत आहे. या सरकारला सर्वसामान्यांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जनतेचा हा पाठिंबा पाहून काही लोकांना नैराश्य आलं आहे. त्या नैराश्यातूनच हे लोक राजकारण करत आहेत. आपल्याला सत्ता मिळाली नाही याचा संताप आणि अस्वस्थता हे लोक या माध्यमातून व्यक्त करत आहेत, अशी टीका पवारांनी केली. सत्ता गेल्यानंतर त्रास होतो हे मी समजू शकतो. त्या त्रासाच्यापोटी, उद्वेगापोटी विरोधक काही शब्द वापरत आहेत. त्याला गांभीर्याने घेऊ नये, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. फडणवीस यांनी राज्य सरकारला बेईमान सरकार म्हटलं होतं. त्यावर पवारांनी पलटवार केला.
















