अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेच्या वतीने प्रताप महाविद्यालयात 2 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाविद्यालय परिसरातील व महाविद्यालयाच्या वसतिगृह मधील विवीध समस्यांना घेऊन संतप्त विद्यार्थ्यांनी अभाविपच्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.
या आंदोलनापूर्वी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी अनेकवेळा सर्व समस्या महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिल्या, परंतु महाविद्यालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी अभाविपशी संपर्क करून सर्व समस्या मांडल्या व अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष वसतीगृहात जाऊन सर्व समस्यांची पाहणी करून प्राचार्यांना निवेदन सादर केले. त्याकडेही प्राचार्यांनी दुर्लक्ष केले. या सोबतच महाविद्यालयातील अन्य समस्या देखील महाविद्यालय प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणुन दिल्या, परंतु महाविद्यालय प्रशासन याकडे दुर्लक्षच करत होते व समाधानकारक उत्तर विद्यार्थी व कार्यकर्त्यांना मिळत नव्हते.
याच महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झालेला विद्यार्थी मारोती शिंदे (सातारा) हा विद्यार्थी प्रताप महाविद्यालयात 2019 साली MSC उत्तीर्ण झाला. त्याला आजपर्यंत मार्कशीट देण्यात आले नाही. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता असे लक्षात आले की, विद्यापीठाने या विद्यार्थ्याला अपात्र ठरवले आहे. त्याचे कारण म्हणजे या विद्यार्थ्याचे मायग्रेशन प्रमाणपत्र जमा केले नाही असं विद्यापीठाचे म्हणणे आहे. त्या विद्यार्थ्याने त्याचे मायग्रेशन सहित सर्व कागदपत्र महाविद्यालयात जमा केले आहेत. महाविद्यालय प्रशासन याची कबुली देखील देत आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालय व विद्यापीठ यांच्या समनव्यातुन आतापर्यंत मार्ग काढायला हवा होता. या विद्यार्थ्याचे तीन वर्षाचे नुकसान या महाविद्यालय प्रशासन केले आहे. मारोती शिंदे या विद्यार्थ्यांने आतापर्यंत सातारा येथुन ये-जा करत अनेकवेळा महाविद्यालयाला भेट दिली व अर्ज सादर केला आहे. याकडेही महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अशाप्रकारचे अनेक प्रश्न या महाविद्यालयातून समोर आले असता विद्यार्थी अशा अनेक समस्यांना सामोरे जात आहे. त्यामुळे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली.
सदरील आंदोलन यशस्वी झाले असुन पुढील आठ दिवसात सर्व प्रश्नांवर काम करण्याचे लेखी आश्वासन प्राचार्यांनी दिले आहे.
मागण्या –
१) महाविद्यालयातील निगडीत घटकांना सोडून इतर कोणालाही महाविद्यालयात प्रवेश नको.
२) नेमून दिलेल्या जागेवरच वाहने पार्क व्हावीत. कॉलेज कॅम्पस मध्ये गाड्या येऊ नयेत.
३) BSC(comp) चे संगणक सुस्थितीत आणावे.
४) वसतीगृहातील प्रसाधन गृह यांची सुव्यवस्था करावी.
५) वसतीगृह, सर्व डिपार्टमेंट, सर्व क्लासारूम, सर्व प्रसाधन गृह यांची नियमित साफ सफाई करण्यात यावी.
६) कॉलेज मधील एकमेव सपोर्ट ग्राउंड व स्टेडियम असून ते सुस्थितीत नाही ते सुस्थितीत आणावे.
या आंदोलनात अभाविपचे प्रदेश सहमंत्री भावेश भदाणे, जळगाव जिल्हा संयोजक इच्छेश काबरा, अमळनेर शहर मंत्री अमोल पाटील, अमळनेर तालुका संयोजक केशव पाटील, गौरव पाटील, विद्यार्थी मारोती शिंदे, जयेश सोनवणे, जितेंद्र बडगुजर, अनुज पाटील आदी विद्यार्थी कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्यांनी पुढील ८ दिवसात सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर जिल्हा संयोजक इच्छेश काबरा यांनी प्राचार्यांचे व महाविद्यालय प्रशासनाचे आभार देखील मानले.