सातारा (वृत्तसंस्था) कातरखटाव-वडूज रस्त्यावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येरळवाडी येथील वृद्धास चोरट्यांनी पोलीस असल्याचे सांगत सात तोळे सोन्याचे दागिने घेऊन धूम ठोकल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, येरळवाडी ( ता. खटाव ) येथील नानासो मारुती itie बागल (वय ६८ ) हे वडूज येथे वास्तव्यास आहेत. ते सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून कातरखटावकडे निघाले होते. ते कुंभार मळवी पुलाजवळ आले असता दोघांनी त्यांना थांबवले आणि आपण पोलीस असल्याचे सांगूण त्यांच्याकडील रुमाल बागल यांच्या तोंडावर रुमाल झटकला.
आम्हाला झडती घ्यायची असल्याने गळ्यातील सोन्याची चैन व हातातील अंगठया काढून ठेवा असे सांगितले. त्यानुसार बागल यांनी गळ्यातील सोन्याची चैन व अंगठ्या काढल्या असता चोरट्यानी सात तोळ्यांचे दागीने हातोहात लंपास करत त्यांच्या काळया रंगाच्या पल्सर दुचाकीवरून वडूजकडे धूम ठोकली. या तोतया पोलिसांनी हेल्मेट परिधान केले होते व गळ्यात बनावट ओळखपत्र अडकवले असल्याचे बागल यांनी सांगितले. घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून परिविक्षाधिन पोलिस उपाधिक्षक अजय कोकाटे अधिक तपास करीत आहेत