नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे केले आहेत. हे कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी मागच्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. दरम्यान, आधीच्या सरकारच्या धोरणामुळे छोट्या शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचेही मोदी म्हणाले.
यावेळी मोदी पुढे म्हणाले, म्हणाले नवे कृषी कायदे शेतकऱ्याला बळ देणारे आहेत. आधी शेतकऱ्यासाठी जोखीम जास्त असायची. पण आता उलटं झाले आहे. शेतकरी अधिक सुरक्षित असेल तर करार करणाऱ्याला किंवा कंपनीची जोखीम जास्त असेल” असे मोदींनी सांगितले. शेतकऱ्याला वाटलं तर तो करार रद्द करु शकतो पण करार करणारी कंपनी असा एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमच्या सरकारला विरोध करणाऱ्यांबरोबरही आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण तर्क आणि मुद्यांवर चर्चा होईल असे मोदींनी स्पष्ट केले.
कृषी सुधारणा कायद्यांबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “नव्या कायद्यामुळे शेतकरी त्यांचे उत्पादन हवे तिथे विकू शकतात. जिथे तुम्हाला चांगला मोबदला मिळेल, तिथे तुम्ही पिकवलेली वस्तू विका”. “तुम्हाला बाजारपेठेत, खरेदीदारांना उत्पादन विकायचे असेल, तर विकू शकता. शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य मिळत असेल तर त्या सुधारणांमध्ये चुकीचे काय आहे?” असा सवाल मोदींनी केला. “काही लोकांना फक्त खोटी माहिती पसरवण्यामध्ये रस आहे. या कायद्यामुळे बाजारपेठ आणि एसएसपी पद्धत जाईल असे पसरवले जात आहे. पण असे काही घडणार नाही” असे मोदी म्हणाले.
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आजचा २९ वा दिवस आहे. कृषी कायद्याचे फायदे पटवून देण्यात आणि शेतकऱ्यांचं समाधास करण्यास मोदी सरकारला आत्तापर्यंत यश आलेलं नाही. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांशी संवाद डिजिटल माध्यमाद्वारे संवाद साधत आहेत. या अगोदर दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. देशाचं पंतप्रधान पद तीन वेळा भूषवणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९६ वी जयंती आहे. ‘सुशासन दिवस’ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. याच निमित्तानं दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘संसद में अटल बिहार वाजयपेयी : एक स्मृति खंड’ नावाच्या एका पुस्तकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद झाल्यानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी तीन नव्या कृषी कायद्याचा विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हा कायदा कसा योग्य आहे, त्यात शेतकऱ्यांचे कसे हित दडले आहे. ते सविस्तरपणे समजावून सांगितले. केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीय. तिथलं सरकार राजकीय कारणांमुळे हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीय असं मोदी म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
पंतप्रधान म्हणाले की, बंगालचे ज्यांनी नुकसान केले ते आता दिल्लीत आंदोलन करतायत. पंजाबच्या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्याच पक्षाचे केरळमध्ये सरकार आहे. तिथे एपीएमसी नाही का? मग केरळमध्ये एपीएमसीसाठी आंदोलन का करत नाही? असा सवाल मोदींनी केला. आधीच्या सरकारच्या धोरणामुळे छोट्या शेतकऱ्याचे नुकसान झाले. छोट्या शेतकऱ्यांना बँकांकडून पैसे मिळत नव्हते कारण त्यांच्याकडे बँक खाते नव्हते. छोट्या शेतकऱ्यांना पाणी, वीज मिळत नव्हती. ते कोणाच्या गणतीमध्येच नव्हते. इतकी वर्ष सत्ता उपभोगली पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिले. गरीब शेतकरी अजून गरीब झाला, असं देखील मोदी म्हणाले.
















