नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह भाजपने मागच्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विटरवर #CM_नहींPMबदलो ही मोहीम सुरु केली असून या अंतर्गत मोदींचे पंतप्रधान म्हणून अपयश अधोरेखित करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे.
भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलंय. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश झाकले जाणार नाही, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उपाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार?, असं काँग्रेसने अन्य एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलंय. श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र असल्याचं अन्य एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे.
















