अहमदनगर (वृत्तसंस्था) कोरोनावरील लसीसंबंधी सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात ही लस करोनायोद्धयांना देण्यात येत आहे. तरीही ती घेणे न घेणे यावरून चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही आपण आताच ही लस घेणार नसल्याचे सांगितले. त्यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेताना एक किस्सा सांगत त्यांनी लोकांना मात्र काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नगरमधील खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी पवार आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी कोरोनासंबंधी भाष्य केले.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सध्या देशात लसीकरण सुरु आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आले आहे. लवकरच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरु होईल. कारण या गटालाही कोरोना व्हायरसपासून मोठा धोका आहे. सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय नेत्यांना लसीचे डोस कधी देणार? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या शरद पवारांनी आपण इतक्यात लस घेणार नसल्याचे सांगितले. “कोरोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस पुनावाला माझे वर्ग मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी मी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला बीसीजीची लस दिली. तू जास्त फिरत असतोस, तेव्हा प्रतिकारशक्ती वाढवणारी लस घे, असे सांगत त्यांनी मला बीसीजी लसीचा डोस दिला होता” असे शरद पवार यांनी सांगितले.
अलीकडेच सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकल्पातील एका इमारतीला आग लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी मी तिथे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, “आता मी नगरला दोन खासगी रुग्णालयाच्या उद्घटनासाठी निघालो आहे. तिथे जाऊन परिस्थिती पाहतो. परिस्थिती गंभीर असेल, तर मुंबईला न जाता पुण्याला येऊन लसीचा डोस घेईन असे सांगितले. आता इथे परिस्थिती पाहिली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे मी आता पुण्याला न जाता थेट मुंबईला जाणार आहे.”
लॉकडाऊन आणि पूर्वीच्या परिस्थितीबद्दलही त्यांनी भाष्य केले, ते म्हणाले.’ कोरोनासाठी लॉकडाउन करण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. पंतप्रधान सांगतात दो गज की दुरी ठेवा. मात्र, प्रत्यक्षात ते होत नाही. कोरोनाच्या काळात सर्वांत प्रथम मी बाहेर पडलो. लोक अडचणीत असताना घरात बसणे मला पटले नाही. त्यामुळे राज्यभर फिरून लोकांना दिलासा दिला. आता कोरोनाची स्थिती बऱ्यापैकी सुधारली आहे. तरीही लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. थोडी परिस्थिती बदलली की आपण आपल्या कामाला लागतो. मात्र, हे संकट भयाण आहे. जगाला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. काही देशांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागत आहे. भारतीयांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आपल्या कमी त्रास होतो. मात्र, तेवढ्यावर समाधान मानले तर मोठे संकट येऊ शकते.’