नांदेड (वृत्तसंस्था) आई- वडील अन् भावाला संपविण्याच्या उद्देशाने त्यांच्या पिण्याच्या पाण्यात चक्क विष टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव दिगांबर बोकारे (३०, रा. राहाटी) असे दारुड्या मुलाचे नाव आहे.
दारूचे व्यसन असल्यामुळे माधवच्या आई-वडिलांनी त्यांच्या बायकोला माहेरी नेऊन सोडले होते. त्यामुळे माधव हा अस्वस्थ झाला होता. २५ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास माधवने आई वडिलांना माझ्या बायकोला परत घेऊन या, असे सांगितले. त्यावर आई वडिलांनी जोपर्यंत तू दारू सोडत नाहीस, तोपर्यंत तुझ्या बायकोला परत आणणार नसल्याचे सुनावले.
आई वडिलांच्या बोलण्याचा माधवला राग अनावर झाला. त्यातूनच त्याने आई-वडील अन् भावाचा काटा काढण्यासाठी मोठा कट रचला. त्यांना पिण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या भांड्यात माधवने चक्क विष टाकले. तसेच माझ्याबाबत कुठे तक्रार केल्यास दुसरी मुले आणून जिवंत मारतो, अशी फोनवरून धमकी दिली. या प्रकरणात दिगांबर बोकारे यांच्या तक्रारीवरून मुलगा माधव बोकारे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास पोउपनि केजगीर हे करीत आहेत.