काबूल (वृत्तसंस्था) तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी अफगाणिस्तान का सोडावं लागलं हे सांगितलं आहे. फेसबुकवर रात्री उशिरा त्यांनी याबाबत माहिती दिली. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तान सोडलं, असे घनी यांनी म्हटले आहे.
गनी यांनी फेसबूकवर पोस्ट करत देश सोडण्याचं कारण सांगितलं आहे. अशरफ गनी यांनी रविवारी म्हटलं की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबाननं प्रवेश केल्यानंतर आपण होणाऱ्या रक्तपातापासून वाचण्यासाठी देश सोडला. आपल्या फेसबूक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये गनी म्हणाले की, एका कठिण निर्णयाचा सामना करावा लागला. ज्यात २० वर्षांच्या युद्धानंतर लाखो काबूल रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आली होती. ज्यात अगोदरच असंख्य लोक मारले गेले होते. राष्ट्रपती भवन आणि देश सोडल्यानंतर गनी यांनी रात्री उशिरा फेसबूक पोस्ट केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, रक्तपातापासून वाचण्यासाठी मी विचार केला की देश सोडणं हा एकमेव पर्याय असेल.
आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल. भारताशी चांगले संबंध हवेत, तालिबानकडून भूमिका स्पष्ट पुढे ते लिहितात की, जर मी अफगाणिस्तानमध्ये थांबलो असतो तर मोठ्या संख्येनं लोक देशासाठी लढायला रस्त्यावर उतरले असते. सद्याची परिस्थिती पाहता असंख्य लोकांचा मृत्यू झाला असता. यात देशाची राजधानी काबूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे.
मात्र, अशरफ घनी यांनी आपल्या पोस्टमध्ये ते सध्या कुठे आहेत हे सांगितले नाही. अफगाणिस्तानातील एका वृत्तवाहिनीच्या मते, घनी ताजिकिस्तानला गेले आहेत. शांती प्रक्रियेचे प्रमुख अब्दुल्ला-अब्दुल्ला यांनी अफगाणिस्तानला या स्थितीत आणण्यासाठी अश्रफ घनी यांना दोषी ठरवले. दरम्यान, अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याचबरोबर काबूल विमानतळावरून उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.