नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये सुरू असलेल्या वादावर मौन सोडलं आहे. चौटाला यांनी म्हटलं आहे की, त्यांच्यासाठी सदैव शेतकरी सर्वप्रथम आहे. जर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळाली नाहीतर मी राजीनामा देणाऱ्यांमध्ये सर्वात पहिला असेल. यामुळे आता हरियाणामधील भाजपा सरकार समोर नव्या अडचणी निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज १६ वा दिवस आहे. इतक्या दिवसांपासून आंदोलन सुरू असून यावर केंद्राकडून काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळ शेतकऱ्यांनी आता हे आंदोलन अतिशय तीव्र केले आहे. या शेतकरी आंदोलनाची झळ आजूबाजूच्या राज्यांमधील राजकाणावरही बसत आहे. शेतकऱ्यांना MSP मिळाली नाही तर राजीनामा देईन असा इशारा हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंह चौटाला यांनी दिला आहे. यामुळे हरियाणातील बहुमतापासून दूर असलेल्या भाजपच्या मनोहरलाल खट्टर यांचे सरकार संकटात येण्याची शक्यता आहे. भाजप आणि जेजेपी यांची गुरुवारी एकत्रितरित्या एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये शेतकरी आंदोलनावर चर्चा झाली. ही बैठक पार पडल्यानंतर शेतकऱ्यांना MSP मिळाली नाही तर राजीनामा देईन, असे वक्तव्य चौटाला यांनी केल्याने हरियाणा सरकारवर अस्थिरतेचे सावट पसरले आहे. दरम्यान दुष्यांत सिंह चौटाला यांच्या पक्षाची ओळख ही शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राहिलेली आहे. त्यामुळे त्यांना भूमिका घेणे भाग आहे.
उपमुख्यमंत्री चौटाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकार किमान आधारभूत किंमत (एमएसपी) साठी शेतकऱ्यांना लिहून देण्यासाठी तयार आहे. शेतकरी संघटनांची सातत्याने सरकारशीच चर्चा सुरू आहे. अशावेळी लवकरच यावर तोडगा निघेल. तसेच, चौटाला यांनी हे देखील सांगितले की, जो पर्यंत ते सरकारमध्ये आहेत, तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) चा मुद्दा मांडत राहतील व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी एमएसपी मिळेल याची हमी घेतील.