चोपडा (प्रतिनिधी) पूर्वीच्या काळी शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर असे होते तिथे खरोखरच जीवनाचे शिक्षण तेव्हा मिळत होते. तेव्हा विद्यार्थ्यांची आवड ओळखून त्यांच्यावर संस्कार केले जात होते. आज मात्र पालकांच्या अवास्तव अपेक्षा, मुलांवर सांगितला जाणारा मालकी हक्क यामुळे मुलांची भावनात्मक कोंडी होऊ लागली आहे. त्यातून मुलांच्या आत्महत्येची संख्या वाढू लागली आहे. मुलांना शाळेतही व्यक्त होता येत नाही. त्यांच्या आवडी, कल, कौशल्य लक्षात न घेता त्यांच्यावर करियरसाठी लहान वयातच दबाव वाढत आहे. एक प्रकारे समाजाला ‘करिअरचा कॅन्सर’ झालाय, असे परखड मत मांडताना शिक्षकांनी संवादी बनावे, असे धरणगाव येथील विक्रम ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा. रमेश महाजन यांनी व्यक्त केले.
रविवारी सायंकाळी आनंदराज पॅलेस या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे आयोजित ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात ते ‘विद्यार्थी केंद्रीत शिक्षण आणि शिक्षकांची भूमिका’ या विषयावर बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, राष्ट्रातील प्रत्येक समस्येला स्वतःला जबाबदार समजणारा शिक्षक हाच खरा आदर्श शिक्षक होय. शिक्षक हा उत्तम व्यवस्थापक असावा, तो संवेदनशील असावा. शिक्षकाने आई होत मुलांच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा दिली पाहिजे. समाजातील गुणवंत शिक्षकांची विना शिफारस निवड केल्याबद्दल त्यांनी रोटरीचे अभिनंदन केले. यावेळी मंचावर रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. चेतन टाटिया, सचिव रोटे. अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे. गौरव महाले, प्रकल्प सहप्रमुख रोटे. महेंद्र बोरसे, रोटे. संजय बारी हे उपस्थित होते.
प्रा. रमेश महाजन यांच्या हस्ते मंचावरील मान्यवरांच्या उपस्थितीत अर्चना रवींद्र शिंदे (जि प प्राथमिक शाळा, कमळगाव), प्रल्हाद उत्तम पाटील (जि प प्राथमिक शाळा, धानोरे प्र चोपडा), रवींद्रकुमार भीमराव पाटील (जि प मराठी मुलांची शाळा नं.३, चोपडा), पवन पांडुरंग रणधीर (जि प प्राथमिक शाळा, कुंड्यापाणी), भावना रमेश पाटील (जि प मुलींची शाळा, अडावद), तब्बसुम बानो अल्ताफ अली सय्यद (उर्दू हायस्कूल, अडावद), दीपक भास्कर पाटील (सौ प.रा. भादले प्राथमिक आश्रम शाळा, उमर्टी), नितीन मधुकर पाटील (मातोश्री अवंताबाई पाटील अनुदानित आश्रम शाळा, संपुले), अमित आनंदराव बाविस्कर (आश्रम शाळा, हातेड), अनंत श्रीराम पाटील (नूतन माध्यमिक विद्यालय, चुंचाळे), सुरेश शंकर चौधरी (अण्णासो एस. आर. पाटील माध्यमिक विद्यालय, मामलदे) या शिक्षक बंधू भगिनींना ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक अध्यक्ष चेतन टाटिया यांनी, सूत्रसंचालन संध्या शहा यांनी व आभार प्रदर्शन अर्पित अग्रवाल यांनी केले. सोहळ्यास तालुक्यातील शिक्षक त्यांचे परिवार जन व रोटेरियंस उपस्थित होते.