पुणे (वृत्तसंस्था) एका उच्चशिक्षित तेही अमेरिकेत सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या विवाहित तरुणाने त्याच्या पत्नीला लग्नापूर्वी कौमार्यभंग झाला असल्याचा आरोप करत शारिरीक छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विवाहितेने हडपसर पोलिसांकडे सासू सासऱ्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जानेवारी ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक आणि फुरसुंगीत येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उच्चशिक्षित असून पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करते. तर आरोपी पती देखील उच्चशिक्षित असून तो सॉफ्टवेअर अभियंता आहे. आरोपी पती सध्या अमेरिकेतील टेक्सास याठिकाणी नोकरी करतो. आरोपीनं लग्नानंतर काही दिवसांतच फिर्यादीचा छळ सुरू केला होता. चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीनं पीडितेला सतत शिवीगाळ करत मारहाण केली आहे.
कौमार्यभंगाचा ठपका ठेवत आरोपी पतीने पीडितेला सतत मानसिक आणि शारिरीक यातना दिल्या आहेत. तसेच घटस्फोट देण्यासाठी सतत पीडितेवर दबाव टाकला जात होता. मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपींकडून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. आरोपींनी अमेरिकेतील टेक्सास आणि कर्नाटकातील फुरसुंगी याठिकाणी जानेवारी ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान हा छळ केला आहे. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.