जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका शासकीय विश्रामगृहामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची जोरदार चर्चा आज सकाळपासून सुरू आहे. दरम्यान याबाबत अधिकृत कोणतीही माहिती मिळाली नसल्यामुळे ही घटना खरी की, अफवा? याबाबत रात्री उशिरापर्यंत खुलासा होऊ शकला नव्हता.
आज पहाटेपासून जळगावातील एका शासकीय रेस्ट हाऊसमध्ये काल (शनिवार) मध्यरात्री एक कांड घडल्याची वार्ता आगीसारखी पसरल्यानंतर अनेकांनी ‘द क्लियर न्यूज’ला याबाबत फोन करून माहिती विचारली. परंतु रात्री उशिरापर्यंत याबाबत अधिकृत कुठलीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दुसरीकडे सकाळपासून सुरु असलेल्या चर्चा वजा अफवेनुसार एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. त्यानंतर पीडित तरुणीची प्रकृती अती रक्तस्त्रावामुळे गंभीर झाली. शहरात तिच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिला पुणे आणि नंतर मुंबईला नेल्याची देखील चर्चा सुरू होती.
तर या अत्याचारात दोन बडे राजकीय नेते सहभागी आहेत. तसेच यात जळगावातील बड्या नेत्याचा मुलगा सहभागी असल्याचीही चर्चा होती. एवढेच नव्हे तर, काही जणांनी या घटनेचे थेट चाळीसगाव कनेक्शन देखील जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु याबाबत अधिकृत कुठलीही माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये.
दरम्यान, याबाबत पोलीस सूत्रांनी अशा कुठलीही घटनेबाबत ऐकीव माहिती देखील नसल्याचेही सांगितले. त्यामुळं जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हेतुपुरस्कर अफवा पसरविण्यात आली असावी, अशी देखील चर्चा आहे.