पाळधी/जळगाव ( प्रतिनिधी ): महिनाभरापूर्वीच घेतलेल्या नवीन कारच्या लकी ड्रॉमधील बक्षीसाची माहिती घेऊन परतत असताना भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात शिवसेनेचे तळई उत्राण गट प्रमुख देशमुख चुन्नीलाल राठोड (५५, रा. निपाणे तांडा, ता. एरंडोल) व त्यांचा नातू परेश दिनेश राठोड (६) हे ठार झाले. तर राठोड यांच्या पत्नी बेबीबाई राठोड (५०) या जखमी झाल्या. हा अपघात रविवारी (२५ जानेवारी) दुपारी बायपासवर पाळधीनजीक सावदे-रिंगणगाव फाट्यावर झाला.
निपाणे तांडा येथील देशमुख राठोड यांनी महिनाभरापूर्वीच नवीन कार घेतली होती. त्यात लकी ड्रॉमधून त्यांना काही बक्षीस लागले होते. त्याची माहिती घेण्यासाठी ते पत्नी बेबीबाई व नातू परेश याच्यासह दुचाकीने (क्र. एमएच १९, ईआर १६४२) जळगावला आले होते. कारच्या शोरुममधून माहिती घेतल्यानंतर ते गावाकडे परतत होते.दुचाकी दाबली गेली कंटेनरखाली बायपासवरून ते पाळधीपर्यंत पोहचल्यानंतर सावदे-रिंगणगाव फाट्यावर समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने (क्र. एमएम ०५, एएम ३२४८) दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, दुचाकी पूर्णतः कंटेनरच्या खाली दाबली गेली. या अपघातात देशमुख राठोड व त्यांचा नातू परेश राठोड हे जागीच ठार झाले. तर बेबीबाई राठोड या गंभीर जखमी झाल्या.
देशमुख राठोड पालकमंत्र्यांचे समर्थकअपघातानंतर तीनही जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चालक MH-19ER 1642 आणि वाहन पाळधी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. मयत देशमुख राठोड हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक होते. अपघाताची माहिती मिळताच जि.प.चे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी रुग्णालयात येऊन राठोड कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले.
कारचा आनंद महिनाभरातच हिरावला
राठोड यांनी मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी केली होती. कुटुंबात नवीन कारचा आनंद असताना महिनाभरातच काळाने राठोड यांच्यासह नातवाला हिरावून घेतले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय, मित्र, गावातील मंडळी रुग्णालयात पोहचले. वडील व मुलगा गमावलेल्या दिनेश राठोड यांना दुःख अनावर झाले होते.
















