यावल (प्रतिनिधी) येथील चोपडा रस्त्यावर शहरापासून दोन कि. मी. अंतरावर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात एक जण जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दया महारु बारेला (वय २०, रा. जामुनझिरा, ता. यावल), असे मयत तर मांगीलाल कवशा बारेला (वय २८), सुनीता मांगीलाल बारेला (२५) आणि चिंकी मांगीलाल बारेला (वय ३, रा. शिरवेल, मध्य प्रदेश) अशा तिघां जखमींची नावे आहेत.
यावल शहराबाहेर चोपड्याकडे जाताना अंकलेश्वर- बऱ्हाणपुर राज्य मार्गावर महाजन पेट्रोल पंप आहे. सोमवारी दुपारी ३.३० वाजता दया महारू बारेला (वय २० रा. जामुनझिरा, ता. यावल) याने या पंपावर दुचाकीत (क्रमांक एमपी.०१-क्यूटी. ३०३९) पेट्रोल भरले. यानंतर तो मांगीलाल बारेला, सुनीता बारेला व चिंकी बारेला यांना घेऊन भरधाव वेगात रस्त्यावर आला. याचवेळी समोरून यावल आगाराची यावल- चाळीसगाव बस (क्रमांक एम.एच.१४ बीटी. २९४४) घेऊन चालक राजेंद्र सदाशिव सोनवणे (वय ५१) हे यावलकडून चोपड्याकडे जात होते. रस्त्यावर अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी त्यांनी बस विरुद्ध दिशेने नेत बाजूला असलेल्या शेडमध्ये उतरवली. पण गोंधळात दुचाकीचालक देखील बसच्या दिशेने येऊन धडकला.
या अपघातात दया बारेला हा जागीच ठार झाला, तर मांगीलाल बारेला, सुनीता बारेला व पिंकी बारेला हे तिघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसचालक राजेंद्र सोनवणे यांनी मृत आणि जखमींना १०८ वाहनातून यावल ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमींवर उपचार केले. पण, प्रकृती गंभीर असल्याने तिघांना जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, बस चालक राजेंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालकाविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास एपीआय विनोदकुमार गोसावी हे करत आहे.