आजपासून एसटी भाडेवाढ लागू ; प्रवासासाठी आजपासून नवीन दर
मुंबई (प्रतिनिधी) एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता, जो २४ जानेवारी रोजी मंत्रालयातील राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर झाला. यामुळे एसटीच्या भाडेवाढीचा दर १४.९७ टक्के झाला आहे, आणि ही भाडेवाढ आजपासून राज्यभर लागू होईल.
एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे की, राज्य सरकारने प्रवाशांना दिलेल्या सवलती कायम राहतील. महिलांसाठी एसटी तिकीटावर ५० टक्के सूट देखील लागू राहील. दिवाळीतील हंगामी भाडेवाढ राज्य सरकारने रद्द केली होती, परंतु एसटी महामंडळाच्या वाढत्या तोट्यामुळे, १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यात आला. याआधी २०२१ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती आणि गेल्या दोन वर्षांत चार वेळेस भाडेवाढीचा प्रस्ताव विचारण्यात आला आहे.
एसटी महामंडळात सध्या १४,००० बसेस कार्यरत आहेत, ज्यात दररोज ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. या व्यवस्थेने महामंडळाला दररोज २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते, मात्र मासिक उत्पन्न आणि खर्च यातील तफावत मुळे दररोज सुमारे ३ ते ३.५ कोटी रुपयांचा तोटा होतो. एसटी महामंडळाच्या भाडेवाढीचे कारण आर्थिक दृष्टीकोनातून स्पष्ट आहे. डिझेलच्या दरात वाढ, कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ आणि इतर खर्चामुळे, भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
असे आहेत नवीन दर
एसटीमधून प्रवास करताना प्रति टप्पा ६ किमीसाठी भाडे आकारले जाते. साध्या बसचे सध्याचे भाडे ८.७० रुपये आहे, ते आता ११ रुपये असेल. जलद सेवा (साधारण) आणि रात्र सेवा (साधारण बस) याचेही भाडे सारखेच असेल. निमआरामसाठी ११.८५ रुपयांऐवजी १५ रुपये मोजावे लागतील. शिवशाही (एसी) बसचे भाडे १२.३५ वरून १६ रुपये झाले आहे. तर शिवशाही स्लिपरसाठी (एसी) १७ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच शिवनेरीचे (एसी) भाडे १८.५० ऐवजी २३ रुपये झाले आहे. तर शिवनेरी स्लिपरचे भाडे २८ रुपये आहे.