वर्धा (वृत्तसंस्था) भाच्यानेच मामाच्या घरात हात साफ करून तीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख ४० हजार ५४९ रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या तपासात या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
फळविक्रेता धर्मपाल माधवराव पाटील (३५, रा. समतानगर, वर्धा) यांच्या घरातून नगदी तीन लाख रुपये, एक सोन्याची चैन, एक सोन्याचे ब्रेसलेट असा एकूण चार लाख ४० हजार ५४९ रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. याबाबत तक्रार वर्धा शहर पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली. पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले. पाटील यांचा भाचा नीलेश दिलीप थूल (२४) याला पोलिसांनी ताब्यात घेउन चोरीबाबत चौकशी केली. यावेळी पोलिसांनी हिसका दाखविताच त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
चोरलेल्या पैशातून सोने तयार केल्याचे सांगितले. त्याच्या घरातून एक सोन्याची मोठी चैन किमत तीन लाख ५२ हजार ३४४ रुपये, एक सोन्याचे पदक असलेले मंगळसूत्र ३८ हजार ५९० रुपये, एक सोन्याचे लहान डोरले असलेले मंगळसूत्र ३७ हजार २७७ रुपये, एक सोन्याची चैन ७७ हजार ५९० रुपये, एक सोन्याची बदामी अंगठी १८ हजार ९८२ रुपये व नगदी एक लाख ५० हजार रुपये असा एकूण ६ लाख ७७ हजार १७३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज हेकाड, पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, पवन लव्हाळे, पंकज भरणे, प्रशांत वंजारी, राधाकिशन घुगे, नंदकिशोर धुर्वे, शिवा डोईफोडे, वैभव जाधव, श्रावण पवार आदींनी केली.