मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक, त्यांचे शोषण तातडीने थांबवण्याबाबत. मागील तीन महिन्यांचे वेतन नाही, कामगार कपातीमुळे भविष्याच्या निर्माण झालेल्या समस्या, त्यांच्या जीवनातील अनिश्चितता याकडे लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मागील तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर आता विरोधी पक्ष भाजप देखील आक्रमक झाले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर आता आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.