अहमदनगर (वृत्तसंस्था) नगरच्या जिल्हा रुग्णालयात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी आपल्या पत्नीला देण्यासाठी एक महत्त्वाची बॅग कर्मचाऱ्याकडे दिली मात्र, कर्मचाऱ्याने ती त्यांना दिलीच नाही. चौकशी केली असता कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी पोलिसांनी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आगीनंतर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉ. रामटेके यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकपदाचा कार्यभार आहे. त्यांनी २० नोव्हेंबर २०२१ रोजी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संजय गंगाधर वाकचौरे (रा. चंदनापुरी ता. संगमनेर) यांच्याकडे एक बॅग दिली. ती बॅग डॉ. रामटेके यांच्या पत्नी कल्पना भूषणकुमार रामटेके (मुळ रा. सिडको, औरंगाबाद) यांना औरंगाबाद येथे देण्यास सांगितले होते. या बॅगेत आठ हजार रुपयाची रोख रक्कम, चार पेन ड्राईव्ह, दोन एटीएम कार्ड होते. वाकचौरे ही बॅग घेऊन गेले. मात्र, त्यांनी औरंगाबादमध्ये कल्पना रामटेके यांना दिलीच नाही.
हे लक्षात आल्यावर तोफखाना पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांना वाकचौरे याला बोलावून चौकशी केली. मात्र, त्याने उडाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळवला आहे. त्यामुळे कल्पना रामटेके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वाकचौरे विरोधात अखेर गुन्हा दाखल केला आहे. ही बॅग गहाळ कशी झाली? ती गहाळ करण्यामागे वाकचौरे याचा काही हेतू होता का? याचा पोलिस तपास करीत आहेत.