
जळगाव (प्रतिनिधी) – बॉल मारुन फेकल्याचा जाब विचारल्यामुळे हर्षल डिगंबर कोळी (वय २३, रा. दशरथ नगर) या तरुणाच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १८ रोजी सायंकाळी आठ वाजता जुना असोदा रोड परिसरात घडली. याप्रकरणी स्वप्निल राजेंद्र कोळी (रा. दीनकर नगर) याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जूना असोदा रस्त्यावरील दुर्गादेवी मंडळात हर्षल कोळी हा मोबाईल बघत बसला होता. त्यावेळी स्वप्निल कोळी याने त्याला बॉल मारुन फेकला. दरम्यान, हर्षलने त्याला जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ करीत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी तैथे असलेल्या राकेश सोनवणे व तेजस सोनवणे यांनी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वप्निल कोळी याने तेथे पडलेली प्लास्टीकची खुर्ची हर्षलला मारुन फेकली. त्यानंतर तेथे पडलेला दगड हर्षलच्या डोक्यात टाकून त्याला गंभीर जखमी केले. जखमी हर्षलने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनिपेठ पोलिसात तक्रार दिली.
















