चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळील नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेला रविवारी आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट दिल्यानंतर अत्यंत विदारक चित्र समोर आले. गुरांना खाऊ घालणार नाही अश्या सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्यापासून विद्यार्थ्यांना जेवण बनवले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. सडलेला कांदा, किडलेली कोबी, बिट सडलेले, गिलके पिकलेले, तांदूळ खराब असल्याने यापासून बनवलेले जेवण विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने आमदारांनी संबंधितांना धारेवर धरत हा प्रकार मुख्यमंत्र्यांना कळवत दोषींवर कारवाईची मागणी केली.
शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावला
आमदारांनी केलेल्या पाहणीत शाळेतील शौचालय व स्नानगृहे यांचे दरवाजे तुटलेले दिसून आले तसेच बेड ज्या साईजचे होते मात्र त्यावर असणार्या गाद्या अत्यंत छोट्या होत्या तर शाळेचा शैक्षणिक दर्जा अतिशय खालावलेला दिसून आला. दहावीमधील विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नव्हते तर सहावीतल्या विद्यार्थ्यांला आपल्या आईचे नाव लिहिता आले नाही.
शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय चांगल्या सुविधा असणारी शाळा उभी केली आहे. येथे शिक्षण घेणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या फक्त जेवणावर महिन्याला 1800 रुपये खर्च शासन देते. यासोबतच शिक्षकांना लाखोंचा पगार, सोयी-सुविधा शासन देते. पालकदेखील मोठ्या अपेक्षेने मुलांना याठिकाणी शिक्षणासाठी पाठवतात मात्र इकडे ठेकेदार व प्रशासनाची भ्रष्ट युती विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करत आहे. तसेच शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याने भावी पिढीचेदेखील नुकसान होत आहे.
प्रशासकीय यंत्रणा किडली ः आमदार मंगेश चव्हाण
भाजपा सेना महायुती सरकार अतिशय संवेदनशीलपणे राज्याच्या हितासाठी काम करत आहे. दलित, आदिवासी, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेत आहेत मात्र त्या शाळेच्या स्वयंपाकघरात किडलेल्या भाजीपाल्याप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा देखील किडली असल्याने शासनाच्या गरीब कल्याणाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. या गंभीर बाबींची तक्रार मुख्यमंत्री, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार असून जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे जेवण, चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे आमदार मंगेश रमेश चव्हाण म्हणाले.