जळगाव (प्रतिनिधी) जीवनात प्रयत्नात यश असते. अवगत असलेले गुण विद्यार्थ्यांनी जोपासून विविध नैपुण्य प्राप्त करून आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले.
जळगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने कुसुंबा येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात जळगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.अनिल झोपे, शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, अधीक्षक विजय पवार, मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे आदी उपस्थित होते. स्वागत गीताने विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शालेय जीवनातील गंमती सांगितल्या, जिल्हा नियोजन मधून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी वर्गातील इलेक्ट्रिक फिटिंग, स्वच्छता गृह व शौचालय व वर्ग खोल्यांच्या दुरुस्ती आणि बळकटीकरणासाठी ४ कोटी ५३ लाखांचा निधी मजूर केल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी मोबाईल चे दुष्परिणाम सांगून त्यापासून लांब राहावे असा विद्यार्थ्यांना उपदेश करून अशा विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतील, देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव वैज्ञानिक दृष्टी ने समृध्द होण्यास मदत होईल. विज्ञानाचे फायदे आणि तोटे असले तरी त्यातून काय घ्यावे याची मुलांना जाणीव होण्यासाठी अशी प्रदर्शने निश्चित फलदायी ठरतात. तर प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी जीवनात स्पर्धेला महत्व असून विद्यार्थ्यांनी कठोर तयारी करावी. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण व्हावा. समाजातील अज्ञान अंधश्रद्धा नाहीशी व्हाव्यात हेच या प्रदर्शनाचे फलित असेल. चांगले नागरिक निर्माण होण्यास मदत होईल.असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले. आभार गट शिक्षणाधिकारी खलील शेख यांनी मानले. सूत्रसंचालन उपशिक्षिका शितल अहिरे यानी केले. सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सुमारे १२५ उपकरणे व साहित्याची मांडणी करण्यात आली होती. स्वामी समर्थ शाळेच्या शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.