मुंबई (वृत्तसंस्था) कल्याणमध्ये प्रेम प्रकरणातून धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या वादातून भर चौकात दोन जणांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्यातील एका कार चालकानं त्याच्याशी वाद घालणाऱ्या तरुणाला फरफटत नेलं. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याणमधल्या आधारवाडी चौकात सिग्नल लागल्याने कार चालक उभा होता. इतक्यात मोटारसायकलवरुन आलेला व्यक्तीने त्या कारसमोर आपली गाडी आडवी घातली. त्यानंतर या दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. सिग्नल सुटल्यानंतर हा वाद सुरु होता. त्याचवेळी कार चालकाने समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क काही अंतरापर्यंत फरफटत नेलं.
वाद काय होता?
कालचालकाचं नाव प्रवीण चौधरी असं आहे तर मोटरसायकलवरुन आलेल्या तरुणाचं नाव त्रिवेश आहे. नवी मुंबई इथे राहणारा प्रवीण कल्याणमधल्या तरुणीला भेटायला येतो असा संशय त्रिवेशला होता. यावरुनच त्रिवेशने आधारवाडी चौकात प्रवीणशी वाद घातला. ही सर्व घटना तिथल्या एका नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रित केली आहे. याप्रकरणी प्रवीण चौधरी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.