सोलापूर (वृत्तसंस्था) पुण्यातील मोठ्या कार्पोरेट कंपनीत नोकरीला असलेल्या पती-पत्नीचा कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी घटस्फोट याचिका अर्ज मंजूर केला आहे. आणि या दोघांचा दीड महिन्यात घटस्फोट झाला. दोघांचा स्वभाव एकमेकांना पटत नसल्यामुळे ते गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत होते.
वंदना आणि महेश दोघेही पुण्यातील एकाच कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करीत होते. ओळखीने दोघांचा विवाह नोव्हेंबर २०२० मध्ये सोलापूर येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच पती-पत्नीचा स्वभाव जुळत नव्हता. क्षुल्लक आणि किरकोळ कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. दोघांनी पूर्ण विचारांती सहसंमतीने घटस्फोट घेण्यासाठी अॅड. श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील हिंदू विवाह कायदा १९५५ कलम १३ बी प्रमाणे सहसंमतीने घटस्फोट याचिका मार्च २०१२ मध्ये दाखल केली होती.
दोघांमध्ये कोणतेही आर्थिक देवाण-घेवाण नाही. दोघे उच्च द्विपदवीधर आहेत. दोघांना एक लाख ते दीड लाख पगाराची नोकरी आहे. पत्नीला दुसरे स्थळ आले आहे. त्यामुळे सहा महिने थांबणे शक्य नाही असा युक्तिवाद अॅड. श्रीनिवास कटकूर यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी घटस्फोट मंजूर केला.याप्रकरणी पत्नी वंदना आणि पती महेश या दाम्पत्यातर्फे अॅड. श्रीनिवास कटकुर, अॅड. किरण कटकुर आणि अॅड. आनंद सागर यांनी काम पाहिले.