अर्जेंटिना (वृत्तसंस्था) कोणतीही औषधं किंवा उपचारांशिवाय अर्जेंटिनामधील एका महिलेनं एचआयव्ही पासून सुटका केली आहे. या रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीनं या विषाणूचा खात्मा केल्याचंही डॉक्टरांचं मत आहे. दरम्यान, अर्काईव्हज ऑफ इंटर्नल मेडिसीन रिपोर्ट्सनुसार, या महिलेच्या शरीरातील एका अब्जपेक्षा जास्त पेशींची तपासणी करण्यात आली. पण त्यात एचआयव्हीच्या संसर्गाचे काहीही पुरावे आढळले नाहीत.
एचआयव्हीचा नायनाट
काही लोक एचआयव्ही बद्दलच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीसह जन्माला येत असतात याचेच आणखी काही पुरावे या निष्कर्षातून समोर आले आहेत. काही जणांमध्ये अशी काही जनुकं (जीन्स) असतात जी याचा संसर्ग रोखू शकतात. ‘इस्परांझा’ रुग्णांसह इतरांमध्ये एचआयव्हीची लागण होते, पण नंतर ते याचे विषाणू नष्ट करतात. मात्र एचआयव्हीची लागण असलेल्या बहुतांश रुग्णांना आयुष्यभर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी घेण्याची आवश्यकता असते. त्यांनी जर हे उपचार किंवा औषधं घेणं थांबवलं, तर हा सुप्त विषाणू पुन्हा डोकं वर काढून इतर काही समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत, “Elite controllers” विषाणू दडपून टाकण्यास सक्षम ठरत असल्याचं अहवालात समोर आलं आहे, मात्र तरीही यावर अद्याप औषध नाही.
लंडनमधील अॅडम कॅस्टिलेजो यांच्या शरीरातूनही विषाणू बाहेर पडला होता. लंडनमधील अॅडम कॅस्टिलेजो यांना कॅन्सरवरील स्टेम सेल उपचारासाठी दाता (डोनर) मिळाल्यानंतर त्यांच्या एचआयव्हीसाठीच्या रोजच्या गोळ्याही बंद झाल्या होत्या. कॅन्सरच्या उपचारादरम्यान त्यांच्या शरीरातील एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या पेशी नष्ट करण्यात आल्या आणि बदलण्यात आल्या. सुदैवानं त्यांचे डोनर हे जगातील अशा १ टक्के लोकांपैकी होते ज्यांच्या शरीरात एचआयव्हीचा संसर्ग रोखणारी किंवा पेशींमध्ये संसर्ग पसरवणारी जनुके (जीन्स) असतात. मात्र तरीही, कॅस्टिलेजो यांना यामुळं किती दिवस फायदा मिळणार हे निश्चितपणे सांगता येणार नाही.
‘निर्जंतुकीकरण उपचार’ माध्यमातून आशा
मात्र एस्परंझाच्या रुग्णामध्ये आठ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी निदान न होणारा एचआयव्ही आढळला नाही. सॅन फ्रान्सिस्को येथील लॉरील विलेनबर्ग यादेखील त्यांच्या शरीरातील रोग प्रतिकार प्रणालीमुळं स्वतःच एचआयव्ही मधून बऱ्या झाल्याचं आढळलं. यामुळं इतर रुग्णांसाठी ‘निर्जंतुकीकरण उपचार’ च्या माध्यमातून एक आशा निर्माण झाली आहे. “ज्या लोकांना स्वतः हे शक्य होत नाही, अशांसाठी निर्जंतुकीकरण उपचार हा एक मार्ग ठरू शकतो,” असं मत मॅसॅच्युएट्स जनरल हॉस्पिटल, मॅसॅच्युएट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि हार्वर्डच्या रॅगन इन्स्टिट्यूटचे मुख्य संशोधक डॉ. शु यू यांनी म्हटलं.