पुणे (प्रतिनिधी) सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आज तक वृत्तवाहिनीला एक लाखाचा दंड ठोठाविण्यात आला आहे. तर झी न्यूज, इंडिया टीव्ही, न्यूज २४ व आज तक या वाहिन्यांना सार्वजनिक माफी मागायचे आदेश न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशनच्या वतीनं देण्यात आले आहे.
‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीने चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल असंवेदनशील प्रसारण केले होते. त्याचबरोबर सुशांत सिंह राजपूतचे खोटे ट्विट त्यांच्या वेबसाइट वर दाखल्याचा आरोप करत या वृत्तवाहिनीला प्रसारण करण्यास बंदी घातली पाहिजे, अशी तक्रार चित्रपट निर्माते निलेश नवलखा यांच्या वतीने न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड अॅथॉरिटी ( NBSA) व माहिती प्रसारण मंत्रालयाला दि. २० जून २०२० रोजी केली होती.
सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूविषयी वाहिनीचे विधान असंवेदनशील असल्याचेही व त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर लगेच चॅनेलने एक टिकर चालविला ‘तो कसा हिट विकेट आला’ आणि त्याच्या मृतदेहाची छायाचित्रे प्रकाशित केली. या तक्रारीत असे म्हटले आहे की, चॅनलच्या रिपोर्टरने सुशांतच्या दु:खाच्या प्रसंगी कुटुंबातील सदस्यांवर असंवेदनशील प्रश्नांचा भडीमार केला. एवढेच नाही तर टीआरपीच्या नादात आजतक वाहिनीने सुशांत सिंह राजपूतचे ट्विटरचे स्क्रीनशॉट्स खरे म्हणून वर्णन केले आणि त्यांना अभिनेत्याचे अंतिम ट्विट म्हणून सादर केले व लोकांनी सोशल मीडियावर ते खोटे असल्याचा कांगावा केला म्हणून काही वेळाने ते ट्विट वेबसाइटवरून काढून टाकले.
या तक्रारीवर दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशन (NBSA) तर्फे अध्यक्ष निवृत्त सुप्रीम कोर्ट जस्टीस ए. के. सिकरी यांनी याबद्दल आज तक वृत्तवाहिनीला ७ दिवसांच्या आत एक लाख रुपयाचा दंड भरण्याचा आदेश दिला होता आणि शुक्रवार दिनांक २३ ॲाक्टोबर रोजी न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड असोसिएशन (NBSA) ने आज तक, झी न्यूज, इंडिया टिव्ही, न्यूज२४ या वृतवाहिन्यांना २७ ॲाक्टोबर ते ३० ॲाक्टोबरच्या काळात प्राईम टाईम मध्ये सार्वजनिक माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर यूट्यूब व इतर व्हिडिओ संकेत स्थळावरून त्वरीत हटविण्याचे आदेश पारित केले आहे.
इलेक्ट्रॉनिक मीडिया विशेष हिंदी आणि इंग्रजी वृतवाहिन्यांनी काही दिवसात भारतात ‘मीडिया ट्रायल’ व द्वेष पसरवण्याचे काम चालवले आहे. याबाबत आम्ही माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिकासुद्धा दाखल केलेली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती ‘फॅन्ड्री’, ‘शाळा’ या राष्ट्रीय विजेत्या चित्रपटाचे निर्माते व इंडिया अगेन्स्ट हेट्रेडचे संयोजक निलेश नवलाखा यांनी दिली.