नागपूर (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने कृषी कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज नागपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं होतं. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात स्वाभिमानीचे कार्यकर्ते तर्फे आंदोलन करण्यात येत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय स्वाभिमानी संघटनेने आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यातल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. नागपूरच्या संविधान चौकातून या आंदोलनाला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणत्या घेऊन संविधान चौकात आंदोलन सुरू करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वाभिमानीचा मोर्चा संविधान चौकातून गडकरींच्या घराच्या दिशेने निघाला होता. यावेळी स्वाभिमानीचे अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. संविधान चौकात दिवाळी साजरी करुन स्वाभिमानीचे कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घराच्या दिशेने निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवत रविकांत तुपकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
शेतकऱ्यांना किमान हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, त्यासाठी केंद्र सरकारने भरीव पॅकेज द्यावे. हमीभावाने कापूस खरेदी करण्यासाठी तालुकानिहाय CCI चे कापूस खरेदी केंद्र दिवाळीपूर्वी सुरु करावे. सोयाबीनचा प्रति क्विटंल किमान ६००० रुपये भाव स्थिर करण्यासाठी धोरण आखावे. पिकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी केंद्र सरकारने बाध्य करावे. केंद्राने आणलेले कृषी विधेयके रद्द करावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यातील सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आजपासून दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता.