धरणगाव (प्रतिनिधी) कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी खून प्रकरणातील सहाव्या आरोपीचीही आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा सहाव्या आरोपीला अटक केली होती. या आरोपीची देखील आज दुपारपर्यन्त कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी साधारण साडेचार वाजेच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. काल (सोमवार) रोजी पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याशी संबंधित महत्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली असल्याचे कळते.
तपासाच्या दृष्टीने आरोपींची नावे जाहीर नाहीत
जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली होती. दरम्यान, पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची माहिती सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे एका पत्रकार परिषदमध्ये दिली. दरम्यान, तपासावर परिणाम होऊ नये म्हणून आरोपींची नाव पोलीस अधीक्षकांनी गोपनीय ठेवण्याचे आवाहन पत्रकारांना केले होते. त्यानुसार आरोपींची नावे प्रकाशित करण्यात येत नाहीय.
अटक आरोपींनी दिली पोलीस चौकशीत महत्वपूर्ण माहिती
दुसरीकडे रात्री उशिरा या गुन्ह्यातील सहाव्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्या आरोपीला आज दुपारी धरणगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, आधी अटक केलेल्या आरोपींनी पोलिस चौकशीत गुन्ह्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार गुन्ह्यात कोण कोण सहभागी होते? तसेच त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचा सहभाग आहे? याबाबत माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या गुन्ह्याचा मास्टरमाइंड हा पोलीस कर्मचारी असल्याचे या चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
आरोपींची होणार लवकरच ओळख परेड
सोमवारी सायंकाळी धरणगाव न्यायालयात न्या. सावरकर यांच्यासमोर आरोपींना हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी पाचही आरोपींसाठी पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार कोर्टाने आरोपींना १३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पाचही आरोपींची लागलीच जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली होती. अगदी आजही सहाव्या आरोपीला दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची देखील न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश पारित झाले. त्यामुळे या आरोपीची देखील लागलीच जळगाव सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील सहाही आरोपींची येत्या काही दिवसात ओळखपरेड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्ह्याचा कोताही पुरावा किंवाधागा नसतानाही पोलिसांनी आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी करून दाखवली आहे.
काय होती नेमकी घटना?
जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.