मुंबई (वृत्तसंस्था) विक्रात निधी प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. किरीट सोमय्यांपाठोपाठ त्यांचे पुत्र नील सोमय्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांसोबत नील सोमय्यांच्याही अडचणीत वाढ झाली असून अटकेची टांगती तलवार आहे.
किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ नील सोमय्या यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नील सोमय्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त होती. मात्र कोर्टाने ही शक्यता फोल ठरवत नील सोमय्या यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे नील सोमय्या यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर सेव्ह विक्रांतच्या नावे लोकांकडून गोळा केलेला मदतनिधी योग्य कामासाठी वापरण्यात आला नसल्याचा आरोप आहे. हा निधी योग्य ठिकाणी न वापरला जाणं ही सोमय्या पिता-पुत्रांची जबाबदारी होती आणि तेच यासाठी जबाबदार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला तपास करायचा असेल तर ते करु शकतात आणि ताबाही मागू शकतात असंही कोर्टाने सांगितलं आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना आता मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.















