बोदवड (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बोदवड येथील तहसील कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे उपस्थितीत आघाडीतर्फे विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांचेकडे देण्यात आले. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे, पंचनामे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी. नियमित कर्ज फेड करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळावे. शेतातील वीज पंपाचे १५ एच. पी. पर्यंतचे वीजबिल माफ करावे. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजेच कापूस पिकला 12 हजार रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा. केळी, ज्वारी, मका, आदी शेती पिकांना हमखास हमी भाव मिळावा. केळी आणि इतर पिकांसाठी मागील वर्षी न मिळालेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी. केळी, सोयाबीन, कापूस व इतर पिक उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमासाठीच्या जाचक अटी कमी करून सरसकट शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तात्काळ द्या. रासायनिक खते, औषधे, बी – बियाण्यांचे दर कमी करून त्यावरील संपूर्ण जीएसटी रद्द करावा. बंद केलेली पोखरा योजना तात्काळ सुरू करावी. रखडलेले ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे अनुदान तात्काळ द्या. महा डीबीटीवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत प्रक्रिया पूर्ण करून पुर्व संमत्या द्या. चक्रीवादळामुळे शेतातील पडलेले विजेचे पोल व डी.पी. तात्काळ सुरु करा. दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. शेतकऱ्यांना जल-सिंचनासाठी (विहीर, बोअरवेल) अनुदान मिळावे. डार्क झोन उठवून तालुक्यातील सर्व गावांना एम. आर. जी. एस. सिंचन विहिरींना मंजुरी मिळावी. महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये याकरिता पोलीस यंत्रणा अधिक मजबूत आणि सुसज्ज करावी. जल जीवन मिशन योजना अद्याप एकही पूर्ण झालेली नाही, ती लवकरात लवकर पूर्ण करून सुरू करावी. मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेत सुरु असलेल्या घरकुलांची रक्कम तात्काळ अदा करा तसेच सदर अनुदान वाढवून द्या. संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे सहा महिन्यांपासून न मिळालेले लवकरात लवकर वितरीत करावे व नवीन प्रकरणे मंजूर करावीत.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे, ॲड. रविंद्र पाटील यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव ठाकरे या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषण स्थळी तहसीलदार अनिल वाणी, पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी भेट दिली .