जळगाव (डॉ.संजीवकुमार सोनवणे) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून एक विचार आहे.बाबासाहेबांनी भारत देशाला दिलेली स्वातंत्र्य,समता आणि बंधुता ही मूल्ये शाश्वत आहे.याच मूल्यांवर भारताची अखंडता आणि एकात्मता टिकून आहे.बाबासाहेबांनी राज्यघटनेत ‘माणूस’ केंद्रबिंदू मानला आहे.चित्रपट क्षेत्र हे मनोरंजनाचे साधन असले तरी त्यातून जाणारा संदेश हा सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक ठरतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा ठेवणारे आजचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी झुंड या चित्रपटाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांची रूजूवात केलेली आहे.या चित्रपटातून त्यांनी प्रतीकात्मक रुपातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देऊन चित्रपट सृष्टी ही बाबासाहेबांच्या विचारांशी बांधिलकी मानते,हे सिद्ध केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल १९२७ मध्ये दलितांना आवाज मिळवून देणारं ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र सुरू केलं. या घटनेला जवळपास ९० वर्षं उलटून गेल्यानंतरही आपण आज बहिष्कृत भारताबद्दलच बोलतो आहोत, हे मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल.झुंड या चित्रपटाच्या माध्यमातून ही शोकांतिका व्यक्त होते.
‘झुंड’ चित्रपट जवळपास तीन तासांचा आहे आणि काही वेळा त्याची गती वर-खाली होते. ‘फँड्री’ किंवा ‘सैराट’ यांच्याइतका एकसंध अनुभव ‘झुंड’मधून मिळत नाही. पण त्यातली नैसर्गिक ऊर्जा, निरागसता आणि कठोर वास्तवाचं मिश्रण, या गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पाडतात.विविध सामाजिक आशयांचे चित्रपट बनवून मनोरंजनात्मक प्रबोधन हा नागराज मंजुळे यांचा मूळचा स्वभाव आहे. ‘पिस्तुल्या’ या चित्रपटापासून झालेली ही सुरुवात थेट ‘झुंड’ पर्यंत येऊन पोहोचते. वाटेमध्ये फॅन्ड्री, सैराट यासारखे मैलाचे दगड पाहायला मिळतात.सहज आणि सोप्या पद्धतीने गोष्ट सांगणे हे नागनाथ मंजूळे यांचे खास वैशिष्ट्य आहे.अत्यंत क्लिष्ट असणारा विषय सुद्धा सहज आणि साध्या पद्धतीने प्रेक्षकांना पचनी पडणं ही कला नागराजना चांगली जमते.आपल्या चित्रपटांमध्ये नव्या बहुजन चेहऱ्यांना संधी देण्यामध्ये नागराज आघाडीवर आहेत.
उपेक्षित वस्ती मध्ये राहणाऱ्या मुलांना फुटबॉल चे धडे देणाऱ्या नागपुरच्या विजय बारसे यांच्या आयुष्यावरती हा क्रीडा चित्रपट साकारला आहे.बकाल वस्ती मधील मुलांचे जीवन ,त्यांच्या सवयी, व्यसने ,पोलिसांची धाड ,गरिबी आणि हलाखीचे जीवन हे अत्यंत सहजरीत्या साकारले आहे.एका एरियल शॉर्ट मध्ये गरिबी आणि श्रीमंती यामधील रेखा अगदी स्पष्ट दिसत आह.अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका ही जमेची बाजू असली तरी नवीन कलाकारांचे काम त्याच ताकदीचे आहे.चित्रपटाची गाणी श्रवणीय असून अजय अतुल यांनी त्यात जान ओतली आहे.
या चित्रपटाद्वारे समाजामध्ये सोशल मीडियावर दोन गटातून प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. एक गट नागराज मंजुळे यांचे तोंडभरून कौतुक करत आहे तर दुसरा गट त्यांना जातीवादी म्हणून हिणवू पाहत आहे. याबाबत नागराज म्हणतात की,” मी कुठे चुकतोय ते मला दाखवून द्यावे पण सोशल मीडियावर नव्हे तर समोरासमोर. मी माझ्या मध्ये बदल करीन”.चित्रपटामध्ये संवादा व्यतिरिक्त देहबोलीवरून सुद्धा अनेक संवाद घडतात जसे की फुटबॉलच्या मॅच ला प्रोत्साहन देणारे दादा ,फुटबॉल शिकू इच्छिणारा सिक्युरिटी गार्ड.शहरातील सुशिक्षित समजले जाणारे लोक जेव्हा भिंती बाहेर वस्तीमध्ये कचरा टाकतात तेव्हा त्यांना ती हक्काची जागा का वाटते? “अपनी बस्ती गटार मैं हैं पर तुम्हारे दिमाग मैं गंद हैं” हे वाक्य मनाला भेदून जाते.
एक निरागस लहान मुलगा जेव्हा भारत म्हणजे काय ? असं विचारतो तेव्हा स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी खरंच तळागाळातील लोकांना ते कळाले आहे का? असा प्रश्न पडतो.कागदपत्रे मिळवण्यासाठी पाड्या वरती राहणाऱ्या बाप-लेकीची कसरत या काळामध्ये सुद्धा तितकीच लागू पडते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या वेळेस वर्गणी देणारा न देणारा गट येथे प्रथमच साकारला आहे .बॉलिवूडला जे पन्नास वर्षात जमले नाही ते नागराजनी करून दाखवले आहे.कोर्टाच्या दृश्यामध्ये जेव्हा अमिताभ बच्चन म्हणतात,” ही मुले टॅलेंटेड आहेत ,एका दगडात हे डुकराला मारतात हे जगातील सर्वात वेगवान गोलंदाज बनू शकतात”. तेव्हा प्रेक्षकातून टाळ्या आणि शिट्ट्या ऐकू येतात.यावरून वस्तीतील मुलांची बौद्धिक क्षमता दिसून येते.
लोक दोन प्रकारचे असतात एक वस्तीमध्ये राहणाऱ्यांना वाईट आणि तुच्छ नजरेने बघतात परंतु दुसरे लोक त्यांच्यामध्ये राहून त्यांना सुधारण्याचे प्रयत्न करतात विजय बारसे हे त्यापैकीच एक.शेवटच्या फ्रेम मध्ये दाखवले आहे की, चौकट तोडून वस्ती मधल्या लोकांना दलदलीतून बाहेर काढणे गरजेचे आहे आणि ही जबाबदारी ज्यांनी याआधी चौकट ओलांडली आहे त्यांची आहे. असा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अप्रतिम संदेश या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे यांनी देशातील नागरिकांना दिला आहे. नागराज यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे ‘झुंड’मध्येसुद्धा जगण्यातील साध्या कृती आणि प्रसंग मोठ्या घटनांचं निमित्तं ठरतात. चित्रपटातील दलित नायक (अंकुश गेडाम) एका उच्चजातीय मुलाच्या नजरेला नजर भिडवून पाहतो, तेव्हा तो आव्हान देतोय असं मानलं जातं आणि अखेर या गुन्ह्यासाठी त्याला मारहाण होते आणि त्याची मानखंडना केली जाते.तेव्हा तो पेटून उठतो. चित्रपटातील जातविरोधी कथन, नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदपटाविषयीची सूक्ष्म टिप्पणी आणि समाजाच्या परिघावरील लोकांचं चित्रण, यातून राजकीयता उलगडत जाते.
हा चित्रपट एकाच वेळी उमेद देणारा आणि अस्वस्थ करणारा आहे. चित्रपटातील एका प्रसंगात अंकुशची एका उच्चजातीय मुलाशी आणि त्याच्या टोळीशी वादावादी होते, कारण अंकुशने उच्चजातीय मुलाचे पाय धरून माफी मागावी, असं त्या टोळीचं म्हणणं असतं. पण अंकुश तसं करायला नकार देतो आणि अखेरीस त्याला तुरुंगात जावं लागतं. त्या वेळी अमिताभ बच्चन आपल्या दलित नायकाला म्हणतात, ‘हर बार जीतना जरूरी नहीं है.’
हा सल्ला व्यावहारिक आणि सुज्ञतेचा आहे, पण जी व्यक्ती समाजातील उच्चवर्गीय, अभिजन समूहातील नसेल तिला कुठे संघर्ष करायचा आणि कुठे करायचा नाही हेसुद्धा किती काळजीपूर्वक ठरवावं लागतं यावरचं हे मार्मिक भाष्य आहे. या चित्रपटात दादरच्या चैत्यभूमीची पार्श्वभूमी ही सुद्धा प्रतीकात्मक आहे.चित्रपटाच्या अखेरीला अंकुश सर्व अडचणींवर मात करतो आणि ‘स्लम वर्ल्ड कप’ला विमानप्रवास करून जाण्यासाठी त्याला पासपोर्ट मिळतो. तो विमानतळावर जाताना पार्श्वभूमीला चैत्यभूमी दिसत असते.ही चैत्यभूमी त्याला एकप्रकारे ऊर्जा देते.विमानतळावर सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी त्याला त्याचा पट्टा, त्याचे शूज, त्याचं पाकीट आणि त्याने गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांनी ग्रासलेल्या आयुष्यात कायम सोबत बाळगलेला कटर बाजूला काढून ठेवावा लागतो. या अखेरच्या दृश्यचौकटीसुद्धा बऱ्याच अर्थपूर्ण आहेत.
विमान आकाशात झेप घेतं, तेव्हा विमानतळ आणि झोपडपट्टी यांना विभागणाऱ्या भिंतीवरची एक ग्राफिटी दिसते- Crossing the wall is strictly prohibited. (भिंत ओलांडणं निषिद्ध आहे. झुंड मध्ये डॉ. बाबासाहेबांची फ्रेम दिसणं हे भूषणावह आहे. अमिताभ बच्चन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर हात जोडून उभे आहेत.या दृष्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे.या दृष्याविषयी नागराज मंजुळे सांगतात, “बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून मी चालतो.”ते पुढे म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात दिसले, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. असं पहिल्यांदाच झालं आहे की एक मोठे नायक बाबासाहेबांसमोर हात जोडून उभे आहेत. आपल्याकडे असे खूप महापुरूष आहेत ज्यांना आपण पूर्ण पाहत नाही, समजून घेत नाही. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देश आणि जगासाठी खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी आहेत. ज्यावेळेस मी त्यांचे चित्र बघतो त्यावेळेस मला काहीतरी प्रेरणा मिळतेच.” नागराजांच्या मनात बाबासाहेबांविषयी असणाऱ्या निष्ठेचा हा प्रभाव आहे. झोपडपट्टीतील मुलाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेविषयी कळतं, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय काय नि राष्ट्रीय काय, असा प्रश्न विचारतो. राष्ट्रीय म्हणजे भारत, असं त्याला सांगितलं जातं. तेव्हा, ‘भारत मतलब?’ असा प्रश्न तो विचारतो. चित्रपटातील हा साधा, निरागस क्षण अनेक खोल अर्थ घेऊन येतो.
या चित्रपटात अनेक ठिकाणी प्रतीकात्मकता आढळते आणि बॉलिवूडच्या अनेक प्रचलित संकेतांना त्यातून आव्हानही दिलं जातं. एखाद्या चित्रपटात आंबेडकर जयंतीचा उत्सव सुरू आहे आणि अमिताभ बच्चन बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रासमोर आदरांजली वाहतायंत, असं दृश्य तुम्ही कधी कोणत्या चित्रपटात पाहिलं आहे? सर्वसाधारणतः चित्रपटांमध्ये उत्साहवर्धक आणि उत्तेजक पार्श्वसंगीत हे आपल्या उच्चवर्गीय नायकासाठी वापरलं जातं. परंतु, ‘झुंड’मध्ये दलित नायकांसाठी असं संगीत राखून ठेवलं आहे.याचा अर्थ बाबासाहेबांचा मूकनायक आता बोलू लागला आहे. शीर्षक गीतामधले हे बोल पाहा-
अपुन की बस्ती,
गटर मे है पर,
तुम्हारे दिल मे गंद है
गटर की नाली से,
पब्लिक की गाली से,
रास्ते पे आया ये झुंड है
लोगो की फटेगी
बाजू मे हटेगी
आया ये शेरों का झुंड है
अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गीत बरंच काही सांगून जातं आणि प्रत्येक प्रेक्षक आपापले अर्थ त्यातून काढू शकतो. हे गाणं दमनाविषयीचं आहे, शोषणाविषयीचं आहे, आणि त्याच वेळी ते धाडसाने धारदार विडंबनही करून दाखवतं. नागराज मंजुळे यांनी झुंड या चित्रपटाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बांधिलकी मानून चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेला असल्याने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हाच या देशातील तरूणाईला समतेच्या वाटेवर चालण्याचे आवाहन करणारा विचार आहे,हे सांगण्यात यशस्वी होतात.
डॉ.संजीवकुमार सोनवणे
















