मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने ते आज दिनांक ३१ रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याबाबत एकनाथ खडसे यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं आहे.
पुण्यातील भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणी बुधवारी (30 डिसेंबर) मुंबईत चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे मुंबईत दाखल झालेही आहेत. मात्र, ते आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहाणार नसल्याची माहिती समजते. एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत आल्याची माहिती त्यांनी वकिलामार्फत कोर्टात दिली. त्यामुळे ते ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही, असंही सांगण्यात आलं आहे. एकनाथ खडसे सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर देखील आहेत. दरम्यान, एक महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील एका भूखंडाच्या खरेदी प्रकरणी ईडीने चौकशीची नोटीस बजावली आहे. दरम्यान, याआधी देखील याच प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाली होती आणि याचं भूखंडावरून त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. आता याच प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकप्शन ब्युरोकडून पाच वर्षांत चौकशी करण्यात आली होती. तसंच झोटिंग समिती आणि आयकर विभागाने देखील चौकशी केली होती. आता या प्रकरणाची ईडी चौकशी करणार आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडीची नोटीस मिळेल, असंही ते म्हणाले होते. खडसे यांनी जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी बँकेतील घोटाळा उघडकीस आणण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यामध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा होती.