नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला जाणार आहे. देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असून कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. या गोष्टीवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची दखल घेत केंद्र सरकारला निर्देश देत पंतप्रधान मोदींचा फोटो हटवण्यास सांगितले आहे.
ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत त्या राज्यातील कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. तशा स्वरुपाचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य खात्याला लिहिले आहे. सध्या पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यात आणि पद्दुचेरीमध्ये विधानसभा निवडणुकांची आचार संहिता सुरु आहे. मंगळवारी पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असणे हे आदर्श आचार संहितेचा भंग असल्याचं तृणमूल काँग्रेसने म्हटलं होतं. तृणमूलचे नेते खासदार डेरेक ओब्रायन यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई करत निवडणुका असलेल्या राज्यात कोरोनाच्या सर्टिफिकेटवरुन मोदींचे फोटो काढून टाकावेत असा आदेश दिला आहे.
तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “आता पंतप्रधान मोदींचा फोटो कोरोना सर्टिफिकेटवर आहे. त्याचा फायदा आता विधानसभा निवडणुकीत करुन घेतला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या सर्टिफिकेटचा निवडणुकीसाठी दुरुपयोग केला जात आहे. हा आदर्श आचार संहितेचा भंग आहे.” आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला या पाच राज्यांसाठी देण्यात येणाऱ्या कोरोना सर्टिफिकेटमध्ये मोदींचा फोटो हटवण्यासाठी फिल्टरचा वापर करावा लागणार आहे. ही प्रक्रिया करताना आरोग्य मंत्रालयाला काही वेळ लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.