जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात मारहाण करणाऱ्या गुंडांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज व्हॉइस ऑफ मिडीयाचे सुरेश उज्जेनवाल यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन करता येणार नाही. पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मिडीयाच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचे जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्याच्या कार्यकर्त्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच दोषींना कडक शासन करण्यात यावे. तसेच लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधींनी शिवीगाळ किंवा अपमानजनक वक्तव्य पत्रकारांशी करू नये अशी समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांची अर्धातास चर्चा !
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष(ऊर्दू विंग) मुफ्ती हारून नदवी, व्हॉईस ऑफ मीडियाचे साप्ताहिक संघटनेचे जिहाध्यक्ष रविंद्र नवाल, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक, आयाज मोहसीन, विजय वाघमारे, दैनिक साईमतचे प्रमोद बऱ्हाटे, विवेक ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी प्रसाद आयुष यांनी अर्धातास सविस्तर चर्चा केली.