जळगाव (प्रतिनिधी) : सोने खरेदी केल्यानंतर घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकामध्ये बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत प्रियंका कैलास पाटील (वय ४०, रा. जामनेर) यांच्या गळ्यातून ९१ हजार ७७७ रुपये किंमतीची सोन्याची माळ चोरुन नेली. ही घटना दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नवीन बस स्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर येथील रहिवासी प्रियंका कैलास पाटील (वय ४०) या मंगळवारी आपल्या आई-वडिलांसोबत जळगाव येथे सोने खरेदीसाठी आल्या होत्या. दिवसभर सोने खरेदीचे काम आटोपल्यानंतर, संध्याकाळी ४.३० वाजता त्या घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर पोहोचल्या. संध्याकाळी ५ वाजून २० च्या सुमारास जळगाव-जामनेर (एम.एच. १४-बीटी-१९५२) ही बस लागली. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत प्रियंका पाटील बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १९.९६० ग्रॅम वजनाची सोन्याची माळ अत्यंत शिताफीने तोडून चोरून नेली.
पोलीस ठाण्यात बसची तपासणी
बसमध्ये चढल्यानंतर गळ्यातील माळ नसल्याचे प्रियंका यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बस चालक आणि वाहकाला या घटनेची माहिती दिली. प्रसंगावधान राखून चालकाने बस थेट जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिसांनी संशयित प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची झडती घेतली, मात्र चोरीला गेलेली माळ मिळून आली नाही. अखेर ७ जानेवारी रोजी प्रियंका पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















