अफगाणिस्तान (वृत्तसंस्था) तालिबाननं अफगाणिस्तानात कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती भयानक आहे. आता तालिबानने पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवत नॅशनल रेझिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानचा पराभव केल्याचा दावा केल्यावर शुक्रवारी काबूलमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामुळे दोन लहान मुलांसह काही लोक ठार आणि जखमी झाले आहे.
शेवटचे अमेरिकन सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला पूर्ण स्वातंत्र्य असलेला देश घोषित केले. २० वर्षे चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले. शेवटच्या अमेरिकन विमानाने अफगाणिस्तान सोडल्यानंतर अफगाणिस्तान अधिकृतपणे अमेरिकन सैन्यापासून मुक्त झाल्याचे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला होता. त्यानंतर पुन्हा काबुलमध्ये शुक्रवारी रात्री तालिबान्यांनी गोळीबार केल्यामुळे लहान मुलांसह अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती स्थानिक अफगाण वृत्तसंस्थेने दिली आहे.
तालिबानने दावा केला की त्यांनी पंजशीर प्रांतावर कब्जा केला आहे. मात्र तर रेजिस्टेंस फोर्सेज (बंडखोर गट) नं हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच त्यांनी तालिबानचं मोठं नुकसान केल्याचा दावा करण्यात आला आहे. तालिबानच्या या गोळीबारानंतर जखमी लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी त्यांच्या देश सोडल्याच्या बातम्या फेटाळून लावत ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय, तालिबान्यांनी पंजशीर खोऱ्यावर कब्जा केल्याचीही त्यांनी पुष्टी केलेली नाही. अमरुल्ला सालेहनं ट्वीट केलं, की प्रतिकार चालू आहे आणि चालू राहील. मी माझ्या मातीसह इथे आहे, माझ्या मातीसाठी उभा आहे आणि त्याच्या सन्मानाचं रक्षण करतोय.