नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करत असलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृत्यूविषयी मागील काही दिवसांपासून विचारणा करण्यात येत होती. त्यावर आता तालिबानकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दानिश सिद्दीकी हे त्यांच्या मृत्यूसाठी स्वत: जबाबदार आहेत, रिपोर्टिंग करताना त्यांनी आमच्याशी कोणताही समन्वय साधला नाही असं तालिबानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
तालिबानच्या राजनितिक कार्यालयाचा प्रवक्ता असलेल्या सोहेल शाहिन याने भारतीय माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, “तालिबानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला आणि त्यामुळे झालेल्या दानिश सिद्दीकी यांच्या हत्येला ते स्वत: जबाबदार आहेत. रिपोर्टिंग करताना त्यांनी तालिबानशी कोणताही समन्वय ठेवला नव्हता. आम्ही अनेकवेळा पत्रकारांना आवाहन केलं आहे की ते आमच्या ठिकाणी येतात तेव्हा त्यांनी आमच्यासोबत समन्वय साधला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षा प्रदान करु शकतो.”
आम्ही विटंबना केली नाही
तालिबानी दहशतवाद्यांनी दानिशला फक्त गोळ्याच घातल्या नाही, तर त्यांच्या डोक्यावरून गाडीही चालवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यासंदर्भात बोलताना तालिबानच्या प्रवक्त्याने हा दावा फेटाळून लावला. “मृतदेहाची विटंबना आम्ही केल्याचा दावा या पूर्वी दोन ते तीनवेळा आम्ही फेटाळलाय. आम्ही असं करत नाही. अफगाणिस्तानच्या सैन्याने आम्हाला बदनाम करण्यासाठी असं केलं असेल. मृतदेहाची विटंबना करणं हे इस्लामच्या नियमांविरुद्ध आहे,” असंही प्रवक्त्याने सांगितलं.
नक्की काय घडलं?
‘रॉयटर्स इंडिया’चे मुख्य छायाचित्रकार असलेल्या सिद्दिकी यांची १६ जून रोजी हत्या झाली. ते ४० वर्षांचे होते. काही दिवसांपासून कंदहारमध्ये तालिबानी बंडखोर आणि अफगाण सैन्यात सुरू असलेल्या धुमश्चक्रीचे छायाचित्रण ते करीत होते. अफगाणिस्तानची खास सुरक्षा पथके कंदहार प्रांतामधील स्पीन बोल्डाक हा मुख्य बाजारपेठेचा भाग तालिबान्यांच्या ताब्यातून परत मिळवण्यासाठी लढत आहेत. शुक्रवारी पहाटे तेथे तालिबानी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये हल्ले-प्रतिहल्ले झाले. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात सिद्दिकी यांच्यासह एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला,
मूळच्या दिल्लीच्या असणाऱ्या दानिश सिद्दिकी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर ते फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करु लागले. दानिश सिद्दीकी यांना २०१८ मध्ये त्यांचे सहकारी अदनान आबिदी यांच्यासह पुलित्जर पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते पुलित्जर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय होते. दानिश यांनी रोहिंग्या शरणार्थी प्रकरणही कव्हर केलं होतं.