बुलढाणा (प्रतिनिधी) पावसाचे अंदाज शेतक-यांना वेळोवेळी कळत राहिले तर दुबार पेरणीची वेळ किंवा इतरही नुकसान टळेल. जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे प्रमुख पिक असून त्याचे उत्पादन वाढीसाठी अष्ट सूत्रीचा वापर करून शेतकऱ्यांनी 1 जून नंतर पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. त्यादृष्टीने शेतक-यांमध्ये सातत्यपूर्ण जाणीवजागृती करावी शेतकरी बांधवांना अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने आवश्यक दुरुस्त्या व इतर कामे वेळेत पूर्ण करावी, खरीपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बीयाणे मिळावे तसेच खते व पीककर्ज वेळेवर उपलब्ध होईल याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन करावे. खरीप हंगाम तोंडावर असतांना बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा. शेतकऱ्यांना पिक कर्ज तत्काळ उपलब्ध करून द्यावे. बोगस बियाणे व खतांबाबत विशेष दक्ष राहण्याचे बजावले . गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. खरीप हंगामपूर्व माहितीचे सादरीकरण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले.
या बैठकीस खासदार प्रतापराव जाधव, आ.संजय रायमुलकर,आ.संजय गायकवाड , आ.श्वेता ताई महाले , आ.धिरज लिंगाडे, आ.राजेश एकडे, प्रधान सचिव एकनाथ डवले, प्र. जिल्हाधिकारी तथा जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी. भाग्यश्री विसपुते , विभागीय कृषी सह संचालक किसन मुळे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रशेखर पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे , यांच्यासह जिल्ह्यातील कृषी विभगासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कापूस बियाणे मागणी व नियोजन,रासायनिक खतांचा वापर, प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना, मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना, कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत कृषी औजारे वाटप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), चाऱ्याची आवश्यकता व उपलब्धता, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसानाबाबत जिल्हास्तरीय हंगामपूर्व आढावा बैठकीत आढावा घेऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. खरीप हंगामपूर्व माहितीचे सादरीकरण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले. आभार आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे यांनी मानले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात एकूण वहितीखालील क्षेत्र 7.50 लाख हेक्टर असून खरिप क्षेत्र 7.35 लाख हेक्टर आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांत सोयाबीन प्रस्तावित क्षेत्र 4.01 लाख हेक्टर, कापूस इतर 3.34 लाख हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. यानुसार एकूण प्रस्तावित क्षेत्र 7.40 लाख हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी खरीप पूर्ण मशागतीची कामे करतांना स्वताची काळजी घ्यावी. एकाच पिकावर विसंबुन न राहता मुख्य पिकाबरोबर आतंरपीक व मिस्त्रपिक घ्यावे. जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांना व खतांचा कृतीम टंचाई करणाऱ्या वर कठोरात कठोर कारवाई करावी. बियाणे व खते बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तक्रार घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा. अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर आवश्यक त्या ठिकाणी नवीन हवामान यंत्र अपडेट करून मनेरगा किंवा इतर शासनच्या योजना मधून शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनाची माहिती पोहचून लाभ देण्याबाबत तत्पर राहा. महावितरणाने शेतीसाठी अखंड वीज पुरवठा करण्याबाबत दक्ष राहावे . पर्जन्यमानाची अनिश्चितता लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. ही कामे युद्धस्तरावर राबवून मे महिनाअखेरपर्यंत पूर्ण करावीत. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना प्रभावीपणे राबवावी गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत जिल्ह्यातील नुकसान भरपाई साठी 160 कोटी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावून शेतकऱ्यांना बी- बियाणे , खते व शेतीच्या मशागतींच्या कामासाठी खरीप हंगाम पूर्व प्रलंबित प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.बीड पॅटर्न प्रमाणे शेतकऱ्यांना मदत करा. लिंकींग करणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर कारवाई करा,असे निर्देश दिले
शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश !
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत 70 कोटी पिक कर्ज वाटप उदिष्टपैकी 36 कोटी 20 लक्ष पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर राष्ट्रीयकृत बँक 1011 कोटी 20 लक्ष पैकी 112 कोटी 65 लक्ष, ग्रामीण बँक 280 कोटी पैकी 55 कोटी 03 लक्ष व खाजगी बँक 108 कोटी 80 लक्ष पैकी 4 कोटी 66 लक्ष असे पिक कर्ज वाटप करण्यात आले त्यामुळे सर्व बँकांमार्फत एकूण 1470 कोटी उदिष्ट असून त्यापैकी 208 कोटी 54 लक्ष (14 %) पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. याबात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीयीकृत बँकांनी पिक कर्ज वाटपासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.मागील वर्षी सर्व बँकांमिळून 1लक्ष 46 हजार 845 शेतकऱ्यांना 1413 कोटी 28 लक्ष पिक कर्ज वाटप करण्यात आले होते. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार यावर्षी गुणवत्ता नियंत्रण कार्यवाहीसाठी निरिक्षक निहाय व महिना निहाय नियोजन केलेले असून जिल्ह्यातील बियाणे खते व कीटक नाशके उत्पादन स्थळ व साठवणूक स्थळ तपासणी तसेच जिल्ह्याबाहेरील व राज्याबाहेरील उत्पादकांचे साठवणूक स्थळ तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण 14 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले विविध कामांचे उद्घाटन व वाटप !
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कृषी विभागांच्या योजनांची माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कृषी विभाच्या “शासन आपल्या दारी” अंतर्गत महाबीटी मधून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला . पिक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना व प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया योजनेतर्गत प्रातनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांनां ना.गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 15 वारसांना 30 लक्ष धनादेश वाटप करून अनुकंपा तत्वावर नियुक्ती झालेल्या यश हरी सपकाळ व ऋषभ गजेंद्र वाणी या 2 उमेदवारांना वर्ग 4 चे कर्मचारी म्हणून नियुक्ती पत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.
49 हजार शेतकऱ्यांना शेती औजारांसाठी 111 कोटीं अनुदान जमा !
महत्वाचे म्हणजे महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यातील 48 हजार 981 शेतकऱ्यांना सुमारे 111 कोटी 82 लक्ष अनुदान मंजूर करून कृषी औजारे देण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 829 ट्रॅक्टर, 1138 रोटाव्हेटर, 554 थ्रेशर, 498 बीबीएफ आणि पेरणी यंत्र, 501 नांगर 110 पावर टिलर, 226 फवारणी यंत्र, 57 कृषी अवजारे बँक व इतर अनुषंगिक अवजारे मंजूर करून प्राथमिक स्वरूपात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र व थ्रेशर चे वाटप करण्यात आले.
पोकरा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान !
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोकरा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात एकूण 410 गावांची निवड करण्यात आली असून आज पावेतो जिल्ह्यातील 1 लक्ष 28 हजार 930 शेतकऱ्यांची नोंदणी केलेली असून त्यापैकी आज पावेतो 40 हजार 688 शेतकऱ्यांना 172 कोटी 34 लक्ष इतका रकमेचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी उत्पादक गट यांचे 85 कृषी व्यवसाय प्रस्तावांना 10 कोटी 09 लक्ष रकमेचे अनुदान अदा करण्यात आलेले आहे. यात तुषार सिंचन,ठिबक सिंचन , पाणी उपसा साधने व कृषी औजारे इलेक्ट्रिक मोटारपंप , फळबाग लागवड आधारित शेती, पाईप , अश्या अनेक प्रकारच्या बाबींवर रुपये एकूण 182 कोटी 36 लक्ष इतके अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर दिलेले आहे. त्यामुळे पोकरा योजनेच्या माध्यमातून शेतकरी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत असून बदलत्या हवामानात तग धरून ठेवण्यासाठी पराकाल्पाची मदत होत असून ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.