धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात अवैध वाळू वाहतुक सर्रासपणे सुरू असल्याची तक्रार तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्याकडे देण्यास गेलेल्या तक्रारदारास पोलिसांत जमा करण्याची धमकी देण्यात आली. यानंतर मात्र, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस तथा तक्रारदार रामचंद्र माळी यांनी थेट जिल्हाधिका अभिजित राऊत यांना फोनवरून संपूर्ण हकीगत सांगितली. त्यावर श्री. राऊत यांनी तक्रार माझ्याकडे पाठवा. मी कारवाई करायला सांगतो, असे आश्वासन दिले.
रामचंद्र माळी यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, धरणगाव तालुक्यात रात्रीच्या सुमारास वाळूचे अनेक डंपर व ट्रॅक्टरद्वारे चोरीच्या मार्गाने वाहतुक करीत असतात. सदर वाहतुक ही बेकायदेशीर सुरू असून त्यामुळे शासनाचा मोठया प्रमाणावर महसुल देखील बुडत आहे. याबाबत एरंडोल प्रांताधिकारी व धरणगाव तहसिलदार यांना वेळोवेळी तोंडी तक्रार देऊन देखील वाळुमाफियांवर काहीच कारवाई होतांना दिसून येत नाही. धरणगांव तालुक्यात अनेक ठिकाणी वाळुचा अतिरिक्त बेकायदेशीर साठा वाळूमाफियांनी करून ठेवला आहे. तसेच त्याची विल्हेवाट तालुक्यात रात्री बेरात्री वाळुमाफियांकडून बेकायदेशीर पणे सुरूच आहे.
आज सकाळी सदरचा प्रकार श्री.माळी यांनी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या लक्षात आणून देण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असता उलट त्यांनी तक्रारदार माळी यांनाच धमकावण्यास सुरुवात केली. तू येथून जातो की, पोलिसाना बोलावू, अशी धमकी भरल्याने अवैध वाळू वाहतूक तहसीलदार देवरे यांच्या आशीर्वादानेच सूरू असल्याचे जाणवल्याने व त्यांच्या धमकीला घाबरून तक्रारदार श्री. माळी यांनी थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तक्रार केली. बेकादेशीर वाळु प्रकरणात आपण वैयक्तीक लक्ष देऊन वाळुमाफियांवर अंकुश लावुन कायदेशीर कार्यवाही करावी व तहसीलदार यांनी दिलेल्या धमकी संदर्भात गांभिर्याने दखल घ्यावी, अशीही मागणी तक्रारदार रामचंद्र सखाराम माळी यांनी केली आहे. तर तक्रारी निवेदन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील ,जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत.