धरणगाव (प्रतिनिधी) तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून बांभोरी पुलानजीक वाळू तस्करांना चांगलाच घाम फोडला. दरम्यान, वाळूमाफियांविरुद्ध कारवाईसाठी तहसीलदार सहा फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारतांनाचे दृश्य हे एखाद चित्रपटातील शोभावे असेच आहे.
या संदर्भात अधिक असे की, तहसीलदार नितीनकुमार देवरे हे शनिवारी कामानिमित्त विद्यापीठ जवळ आले होते. याच वेळी बांभोरी पुलानजीक वाळू तस्करी सुरु असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार देवरे यांना मिळाली. नदीपात्रातून तीन ट्रॅक्टर वाळूचा भरणा करत असल्याचे दिसताच देवरे यांनी सिनेस्टाईल सहा फुटांवरून उडी घेत नदीपात्रात धाव घेतली. तहसीलदार धावत येत असल्याचे पाहून वाळू भरणाऱ्या वाहनांनी धूम ठोकली. एका प्रत्यक्षदर्शिने तहसीलदारांच्या या धाडसाचं व्हिडीओ शूट करून व्हॉयरल केल्यानंतर देवरे यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, तहसीलदार फिल्मी स्टाइल पाटलाग करीत असल्याचे पाहून वाळू माफियांनी वाहनांसह दिसेल तिकडे पळ काढला. तहसीलदार देवरेंसोबत वाहनचालक असलम पटेल हे देखील पाठलाग करतांना दिसत आहेत. वाळू माफियांनी उत्खनन बंद केले नाही तर फौजदारी गुन्हे दाखल होतील, असा इशारा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिला आहे.