मुंबई (वृत्तसंस्था) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं शनिवारी रात्री समोर आलं. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे.
शनिवारी (२७ मार्च) रात्री साडेआठ वाजता युसूफ पठाणने ट्विट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. ““माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो”, असं युसूफने ट्विट करून म्हटलं आहे.
सचिनने कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्विट करून माहिती दिली होती. तसंच आपण होम क्वारंटाइनमध्ये असल्याचंही सांगितलं होतं. “कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होतो. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचं मी पालन करत आहे. मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्य सेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असं सचिन म्हणाला होता.