मुंबई (वृत्तसंस्था) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत ही माहिती दिली.
पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून तातडीचे मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. तसेच, अन्नधान्यांचं नुकसान झालेल्यांना पाच हजार रुपयांची तत्काळ मदत देण्यात येणार आहे. ”प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुरामध्ये जी घरं गेली किंवा घरात पुराचं पाणी शिरलं आहे, त्या सगळ्या ठिकाणी सर्व कुटुंबास दहा हजार रुपये नगदी रुपाने व पाच हजार धान्य रुपाने ही मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे व मदत देणार आहोतच.” असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
याशिवाय पूर्णपणे घर पडलं असेल त्याला देखील मदत दिली जाणार आहे. ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे. यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून व चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे संपूर्ण पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटंबास दिले जाईल. असं देखील विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.