बुलढाणा (प्रतिनिधी) शेगावरुन पुण्याला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस पैनगंगा नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घेटनेत एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला असून, २० ते २५ जण जखमी झाले आहेत. घटना झाल्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
शेगावहून पुण्याकरता जाण्यासाठी निघालेल्या स्वरा ट्रॅव्हल्स या खासगी लक्झरी बसला चिखली रोडवरील पेठजवळ रात्री साधारण 11 वाजता अपघात झाला. भरधाव वेगाने जाणारी ही ट्रॅव्हल्स थेट पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. जवळपास 15 ते 20 फूट खोल कोसळलेल्या या बसमधील सर्व प्रवासी जखमी झाले असून एका वृद्ध महिला प्रवशाचा मृत्यू झाला आहे. अपघातातील तीन प्रवासी गंभीर असून इतरांना मुका मार लागला आहे. नदीत पडलेली ट्रॅव्हल्स पूर्णपणे उलटली होती. त्यामुळे प्रवासी प्रचंड किंचाळत मदतीसाठी टाहो फोडत होतो. हा आक्रोश ऐकूनच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्यास अडथळे येत होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.