मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील घोडसगाव जवळ रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये दूध (Milk Tanker) टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकरला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान अद्यापपर्यंत मयतांची नावे कळू शककेली नाहीत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मुक्ताईनगर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.