मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकणात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली व एका मुलाचे नाव समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, आता या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केल्यामुळे सत्तांरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच टीईटी परीक्षा न देता देखील यादीत नावे आली असून, यादीत नावे टाकली त्यांच्यावर कारवाई करा असेे सत्तारांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहिजे असेही सत्तार यांनी म्हटले आहे. माझ्याकडे काल दुपारी साडे अकरा वाजता यादी आली, त्यानंतर मी स्पष्टीकरण दिलं की कोणीतरी खोटी बातमी चालवत असून, कोणीतरी आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नाहक बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केले आहे.
कायद्यानुसार त्यामध्ये काही चूक असेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणात माझ्या परिवाराची चूक असेल किंवा मी फायदा घेतला असेल, तर मी गुन्हेगार आहे. मात्र या यादीमध्ये ज्यांनी नावे टाकली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे देखील सत्तार यावेळी म्हणाले.