नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यांच्या हत्येचा कट होता असं मी वाचलं. बाळासाहेबांच्या आशीर्वादानं जी जी माणसं मोठी झाली त्यांना संपवण्याचं कटकारस्थान आजवर कुणी केलं? मी शिवसेना सोडली तेव्हा उद्धव ठाकरेंनी मलाही मारण्याच्या सुपऱ्या दिल्या होत्या. ज्यांना सुपऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा बचाव केला. नक्षलवाद्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती. रमेश मोरे ची हत्या कुणी केली? माझी पण सुपारी दिली होती, पण मी सुदैवाने वाचलो, अशी टीका नारायण राणे यांनी केली. माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री यांच्या तुफानी मुलाखतीवर प्रेस घेतोय. संजय राऊत यांनी आधीच उत्तरं सांगितलेली होती, अशी त्यांची मुलाखत होती, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. आजारपण आणि मातोश्री यातच मुख्यमंत्री पदाची कारकीर्द गेली. आता स्वतःचं पद एकनाथ शिंदे यांना मिळालं याच्या पोटशुळातून त्यांनी मुलाखत दिली, असे राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे एकनंबरचे नाटकी असून चार भिंतीत नाटकं करतात. गेली अडीच वर्ष शिवसैनिक आठवला नाही. जनतेची, हिंदुत्वाची कामं केली नाहीत. स्वत:चं पद एकनाथ शिंदेंना दिल्यामुळे त्यांना पोटशूळ झाला आहे. उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षात कधी शिवसैनिकांशी संवाद साधलाय का? एकातरी शिवसैनिकाला मदत केली का? वारसा काय फक्त रक्ताचा असतो का, वारसा विचारांचा असतो. मुख्यमंत्री असताना घेतलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो नव्हता. आजच्या मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो वापरला. भावनिक राजकारण करुन लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं आहे. बाळासाहेब हयात असताना त्यांना छळण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे”, असं नारायण राणे म्हणाले.
















