मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला. तर भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला असतानाच आता संभाजीराजे समर्थकांनी सेनेला चांगलेच डिवचलं आहे. संभाजीराजे यांच्या समर्थकांनी थेट शिवसेना भवनासमोरच बॅनरबाजी केली आहे. ‘गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार’ असा मजकूर या बॅनर वरती छापण्यात आला आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विशेष करून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्यामुळे शिवसेनेला आता मराठा संघटनाकडून तसंच संभाजीराजे समर्थकांकडून टार्गेट करण्यात येत आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द मोडला, असा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केला होता. त्यामुळे आता या निवडणुकीत राजेंना डावलून दिलेला सेनेचा उमेदवार पराभूत होऊन भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुंबईसह नवी मुंबईत छत्रपती संभाजी महाराज समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून शिवसेना व मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यात आला आहे. “शिवरायांच्या गनिमीकावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार, आज पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा’ अशा आशयाचा मजकुर या बॅनरवर लिहण्यात आला आहे. तसंच राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य मे २०२४ बाकी है! असही या बॅनरवर लिहलं आहे.