जळगाव (प्रतिनिधी)- भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने पुढील दहा वर्षांसाठीच्या मोठ्या विस्तार योजनांच्या नियोजनासह नुकतेच अकरावे वर्ष पूर्ण केले. २७ एप्रिल ते ४ मे २०२५ या कालावधीत फाली ११ अधिवेशनाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि., जैन हिल्स, जळगाव येथे करण्यात आले आहे. तीन टप्प्यात होणाऱ्या अधिवेशनामध्ये फालीचे १,१०० पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या ९० फाली कृषी शिक्षकांसह आणि फाली ११ ला सहकार्य करणाऱ्या अकरा कंपन्यांमधील ५० हून अधिक उच्चस्तरीय आणि वरिष्ठ व्यवस्थापकांसह सहभागी होत आहेत.
फाली ११ मध्ये सहभागी होणाऱ्या १७५ शाळांमधील हे फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या कृषी क्षेत्रातील चार प्रमुख राज्यांमध्ये फाली सध्या कार्यरत आहे. पुढील दहा वर्षांत किमान आणखी तीन मोठ्या राज्यांमध्ये विस्तार करण्याची फालीची योजना आहे. यावर्षी, ग्रामीण भागातील सरकारी अनुदानित शाळांमधील ८ वी आणि ९ वीचे १५,००० पेक्षा जास्त फाली विद्यार्थ्यांनी कृषीशास्त्र, पशुधन शास्त्र, कृषी तंत्रज्ञान, ॲग्रो-एंटरप्राइज आणि ॲग्री-फायनान्स या विषयावरील परस्परसंवादी (इंटरअक्टीव) वर्गात भाग घेतला होता. सर्व मॉड्यूल्समध्ये हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे ज्ञान दिले जाते. FALI चे विद्यार्थी शैक्षणिक वर्षात फाली कृषी शिक्षकांसोबत संवादात्मक सत्रांमधून प्रात्यक्षिकांमधून आणि प्रत्येक शाळेत असलेल्या शेडनेट मधून प्रशिक्षण देतात. ते आधुनिक शेतीसह अग्रगण्य कृषी-उद्योगांच्या ठिकाणी क्षेत्रीय भेटी देतात. वेबिनार आणि व्हिडिओंच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील अनुभवी वरिष्ठांसोबत संपर्क करून अत्याधुनिक नवकल्पना विषयी माहिती मिळवतात. व्यवसायाच्या नवीन योजना तयार करतात व आधुनिक कृषी तंत्रज्ञाना संबंधी संशोधन करतात.
फाली मधील ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक असे म्हणतात की, “फाली ने कृषी आणि कृषी-उद्योगातील भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. विद्यार्थ्यांनी कृषी आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक, व्यवसायिक आणि नेतृत्त्व कौशल्ये फाली मध्ये प्राप्त केली आहेत. आधुनिक आणि शाश्वत शेतीमध्ये भविष्य घडविण्यासाठी फाली मधील अनेक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाच्या शेतामध्ये सुधारित कृषी पद्धती आणि तंत्रज्ञान आणतात.”
फाली मध्ये आता ४५,००० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी आहेत आणि २०३२ पर्यंत ही संख्या २,५०,००० पर्यंत वाढविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
फाली मध्ये इंटर्नशिप, शिष्यवृत्ती आणि कृषी उपक्रमांसाठी सुरुवातीचा निधी (सीड फंडिंग) असे विविध सक्रिय माजी विद्यार्थी उपक्रम चालू आहेत. फाली माजी विद्यार्थी इंटर्नशिप सुविधा प्रायोजित करणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांना मूल्यमापनात भरपूर गुण देतात, ९० टक्क्यांहून अधिक असे म्हणतात की, फाली इंटर्न्स सामान्य कंपनी इंटर्नपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतात आणि ह्या कंपन्या फालीच्या बहुसंख्य माजी विद्यार्थी इंटर्न्सना नियुक्त करू इच्छितात.
फालीचे १५ माजी विद्यार्थी फाली ११ अधिवेशनात सहभागी होणार आहेत. त्यापैकी बहुतेक जण कृषी उद्योग किंवा आधुनिक शेती व्यवसाय उभारत उच्च शिक्षण घेत आहेत. ६०% पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाच्या शेतीमध्ये सुधारणा करत असताना मुख्यत्वे विज्ञान, अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतात. फालीचा ग्रामीण भारतात गेल्या अकरा वर्षांपासून प्रभाव आहे, कृषी आणि कृषी-उद्योग पुढील पिढीसाठी आकर्षक बनवणे, आवश्यक ग्रामीण-शहरी कनेक्शन निर्माण करणे आणि ग्रामीण भारतातील फाली कार्यक्रमात जलद वाढ होण्यासाठी फी च्या माध्यमातून महसूल मिळविणे या उद्देशाने या वर्षी फाली जे मागील वर्षी मोठ्या शहरी शाळांमध्ये एक नविन उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षी फाली १० अधिवेशात सहभागी झालेले फाली चे विद्यार्थी जैन इरिगेशनमध्ये टिश्यू कल्चरच्या रोपांच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे खूपच जास्त प्रभावित झाले. हे हुशार, अस्सल शहरी विद्यार्थी फाली मागील अधिवेशनातील स्पर्धांमध्ये ग्रामीण फाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व्यावसायिक योजना आणि कृषी तंत्रज्ञानातील नवकल्पनांच्या गुणवत्तेने खूप जास्त प्रभावित झाले.
यावर्षी फाली e+ मध्ये भाग घेतल्यानंतर वेबिनार आणि व्हिडिओंच्या माध्यमातून अनुभवी कृषी व्यवसायिक आणि कृषी-उद्योजकांतच्या संपर्कात आल्यामुळे तसेच फाली e+ बुकलेटमधून हायड्रोपोनिक्सपासून ते स्ट्रॉबेरी व्हॅल्यू चेन (मूल्य साखळी) ते कृषी उद्योजकतेमधील आर्थिक व्यवस्थापन आणि निधीचा विचारपूर्वक वापर अशा सर्व बाबींमधील अत्याधुनिक नवकल्पनांबद्दल माहिती मिळाल्यामुळे हेच शहरी विद्यार्थी पूर्वीपेक्षा अधिक उत्साही दिसत होते, आणि या वर्षी, फाली ११ कन्व्हेन्शन मध्ये बिझनेस प्लॅन आणि अॅग्रो टेक इनोव्हेशन स्पर्धांमध्ये, हेच शहरी विद्यार्थी ग्रामीण शालेय स्तरावरील बिझनेस प्लॅन स्पर्धेतील आणि अॅग्रो टेक इनोव्हेशन स्पर्धांमधील विजेत्या उच्च गुणवत्ताधारक ग्रामीण फाली विद्यार्थ्यांसोबत स्पर्धांमध्ये भाग घेतील.
FALI हे दाखवून देत आहे की, जर ग्रामीण विद्यार्थ्यांना परस्परसंवादी शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवसाय ज्ञान आणि अत्याधुनिक नवोपक्रमांची सुविधा दिली तर ते भारतीय शेती आणि कृषी उद्योगात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्र काम करू शकतात आणि शहरी तरुण त्या प्रक्रियेचा भाग बनू शकतात.
फाली ११ मध्ये अग्रगण्य कृषी व्यवसाय आणि वित्तीय संस्थांचा सक्रिय सहभागासह पाठिंबा आहे; ज्यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., गोदरेज अॅग्रोव्हेट, युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, रॅलीज इंडिया, आय टी सी, प्रॉम्प्ट डेअरी टेक, एस.बी.आय फाऊंडेशन,उज्ज्वल स्मॉल फायन्सस यांचा समावेश आहे. तसेच २०२५-२६ ह्या आर्थिक वर्षामध्ये कृषी व्यवसायीक अन्य काही कंपन्या फालीला समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहेत. असोसिएशन फॉर फालीचे बोर्ड मेंबर्स (सदस्य) त्यासाठी अधिकचा पाठपुरावा करत आहेत.
फाली बद्दल मान्यवरांच्या प्रतिक्रिया…
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणतात, ‘शेतकरी आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे व्यवसाय निर्माण करण्यासाठी आम्हाला ग्रामीण आणि शहरी यामध्ये संपर्क साखळी निर्माण करावी लागेल.’ नादीर गोदरेज म्हणतात की, ‘फाली मधील तरुणांना शेती आणि शेती व्यवसाय हे त्यांच्या जीवनाचे कार्य म्हणून करण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले पाहिजे. त्यासाठी आपण फाली माजी विद्यार्थी कार्यक्रम, विशेषत: इंटर्नशिप्स या पुढे ही सुरूच ठेवले पाहिजेत.’
यूपीएलचे अध्यक्ष रज्जू श्रॉफ म्हणतात की, ‘हे युवा नायक भारतीय शेतीतील उत्पादकता सुधारतील आणि हवामान बदलाच्या आव्हानांना योग्य रीतीने सामोरे जातील.’
नॅन्सी बॅरी म्हणतात की, ‘या तरुणांमध्ये धगधगती शक्ती आहे; आपण ती योग्य मार्गाने वापरात ठेवू या. यासाठी भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत २०३२ पर्यंत अडीच लाख फाली माजी विद्यार्थी तयार करणे ही एक खूपच लहान संख्या आहे. पण भारतीय शेतीचा कायापालट करणारे नायक म्हणून ही संख्या खूप मोठी आहे.’
तीन टप्प्यात फालीचे अधिवेशन
जैन हिल्स ला फालीचे अकरावे अधिवेशन २७ एप्रिल पासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात २७ ते २८ एप्रिल दरम्यान होईल. दुसऱ्या टप्प्यात ३० एप्रिल ते १ मे, तिसरा ३ ते ४ मे दरम्यान फालीचे विद्यार्थी अॅग्री बिझनेस व इनोव्हेशन प्लॅन चे सादरीकरण करतील.